फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी) फळांचे गाव म्हणून राज्यभर नावलौकिक मिळालेल्या धुमाळवाडी येथील शेतकरी बंधू भगवान फडतरे व विष्णू फडतरे यांनी जांभूळ लागवडीचा यशस्वी प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कमी क्षेत्रात नियोजनबद्ध लागवड, ठिबक सिंचन आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी जांभूळ बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा मार्ग दाखविला आहे.
कृषी विभागाने “फळांचे गाव” म्हणून गौरविलेल्या धुमाळवाडी येथील या दोन्ही भावंडांनी सन २०२१-२२ मध्ये गुजरातमधून आणलेल्या ‘पारस’ जातीच्या जांभूळ कलमांची १४ बाय १४ फूट अंतरावर लागवड केली. सुमारे २२ गुंठे क्षेत्रात १०० झाडांची बाग उभारून ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यात आले.
लागवडीनंतर चौथ्या वर्षी बागेला फळधारणा सुरू झाली. पहिल्याच वर्षी सुमारे तीन टन उत्पादन मिळाले. जांभळाला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाल्याने फडतरे बंधूंना सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
यंदा पाचव्या वर्षी बागेतील प्रत्येक झाडावर मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. २२ मे २०२६ पासून जांभळाची तोडणी सुरू असून दररोज सुमारे ३०० किलो जांभूळ मिळत आहे. हे उत्पादन मुंबई बाजारपेठेत पाठविले जात असून प्रतिकिलो २०० रुपये दराने दररोज सुमारे ६० हजार रुपयांची विक्री होत असल्याचे फडतरे बंधूंनी सांगितले.
जांभूळ तोडणीसाठी कुटुंबातील सदस्य सदा कार्यरत असल्याने काम करत असल्याने मजुरी खर्चावरही नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. यावर्षी १०० झाडांमधून सुमारे सात टन उत्पादन अपेक्षित असून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करून बाग जपली जात आहे. कृषी विभागामार्फत एल-निनो अंतर्गत आयोजित शिवार फेऱ्यांमधून संरक्षित शेतीबाबत मार्गदर्शन मिळत असल्याचा लाभही त्यांनी घेतला आहे. तसेच धुमाळवाडीचे सहाय्यक कृषी अधिकारी कृषिरत्न सचिन जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
फडतरे बंधूंच्या या यशस्वी जांभूळ बागेला तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह तालुका, जिल्हा आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी भेट देऊन कौतुक केले आहे. कमी क्षेत्रात फळबागांच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याचा आदर्श धुमाळवाडीतील ही जांभूळ बाग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चौकट :
जांभूळ लागवडीचे यशाचे सूत्र
दर्जेदार कलमांची निवड
ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन
नियमित छाटणी व खत व्यवस्थापन
बाजारपेठेचा थेट संपर्क
कुटुंबीयांच्या सहभागातून खर्चात बचत
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा प्रभावी वापर
धुमाळवाडीतील फडतरे बंधूंची ही यशोगाथा फळबाग शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे.








