आपलं फलटण प्रतिनिधी
भारतीय शेती एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीसाठी अधिक कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष या पार्श्वभूमीवर सुरक्षित, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पीकसंरक्षणाची गरज अधिक तीव्र झाली आहे. अशा निर्णायक काळात भारतीय संशोधनावर आधारित के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य (Botanical) पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून मिळालेली अधिकृत मान्यता ही भारतीय कृषी संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
संशोधनातून साकारले अत्याधुनिक वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञान
के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन यादव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली २०१८ मध्ये एका छोट्याशा संशोधन केंद्रातून वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू झाला. संशोधन व विकास (R&D) विभागाने सातत्यपूर्ण वैज्ञानिक अभ्यास, प्रयोग आणि नवकल्पनांच्या बळावर प्रभावी, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवले.
या संशोधन मोहिमेत ७५ हून अधिक संशोधकांनी सलग तीन वर्षे अथक परिश्रम घेतले. हजारो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रांचा अभ्यास, जैव कार्यक्षमता, विषारी परिणाम, पर्यावरणीय सुरक्षितता तसेच आवश्यक वैज्ञानिक दस्तऐवजीकरण पूर्ण करण्यात आले. भारतातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये विविध हवामान आणि हंगामात विस्तृत चाचण्या घेऊन या तंत्रज्ञानाची वैज्ञानिक पडताळणी करण्यात आली. या कठोर आणि बहुपदरी प्रक्रियेनंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून अधिकृत नोंदणी मिळाली.
दोन वनस्पतीजन्य फॉर्म्युलेशन्सना सेक्शन 9(3) अंतर्गत मान्यता
या नोंदणीअंतर्गत फंगो रेझ (थायमॉल आधारित वनस्पतीजन्य बुरशीनाशक) आणि थ्रिप्स रेझ (पायपरीन + थायमॉल आधारित वनस्पतीजन्य कीटकनाशक) या दोन अत्याधुनिक फॉर्म्युलेशन्सना अधिकृत मान्यता आणि पेटंट प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे, ही दोन्ही उत्पादने अवघ्या ४८ तासांत प्रभावी परिणाम देतात. त्यांचा पीक काढणी कालावधी (PHI) शून्य असल्यामुळे काढणीपूर्वी फवारणी करूनही निर्यातीसाठी आवश्यक एम.आर.एल. निकष पूर्ण करण्यास मदत होते. निर्यातक्षम पिकांसाठी हा मोठा लाभ मानला जात आहे.
भारतीय कृषी निर्यातीला मिळणार नवे बळ
सध्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स भारतातील ११ राज्यांमध्ये कार्यरत असून केनिया आणि दक्षिण अमेरिका यांसह ३२ देशांमध्ये निर्यात करत आहे. या नोंदणीमुळे भारतीय वनस्पतीजन्य तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत अधिक व्यापक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आजवर अनेक सक्रिय घटकांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने उच्च दर्जाचे उत्पादन घेणे, निर्यात निकष सहज पूर्ण करणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळवणे शक्य होणार आहे.
विशेषतः युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी प्रभावी वनस्पतीजन्य पीकसंरक्षण उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असल्याने भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याबरोबरच कृषी निर्यातीला मोठी चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एम.आर.एल. निकषांमुळे सुरक्षित शेतीची वाढती गरज
द्राक्षे, डाळिंब, भात, चहा आणि मसाल्यांसारख्या निर्यातक्षम पिकांसाठी कमाल औषध अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकषांचे पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. अमेरिका, युरोप आणि अरब देशांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे भारतीय मिरची, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांचे काही निर्यात कंटेनर्स नाकारल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अशा प्रकारचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही मान्यता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
देशांतर्गत बाजारपेठेतही रासायनिक अवशेषांविषयीची जागरूकता झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षी मध्य प्रदेश शासनाने मंजूर मर्यादेपेक्षा अधिक रासायनिक अवशेष आढळलेल्या सोयाबीनची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुरक्षित आणि मान्यताप्राप्त पीकसंरक्षण उपायांचा स्वीकार ही आता केवळ निर्यातीची नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठेचीही अपरिहार्य गरज बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत सरकारही त्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे.
सुरक्षित अन्नासाठी संशोधनाची नवी दिशा
येत्या काळात जैविक पीकसंरक्षण उत्पादनांची जागतिक मागणी आणखी वाढण्याची शक्यता असून या क्षेत्रात के.बी. बायो ऑरगॅनिक्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सुमारे ६६ टक्के वाढ, तर मधुमेहाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अन्न, कमी रासायनिक अवशेष आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धतीचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.
एकंदरीत, या मान्यतेमुळे अन्नसुरक्षितता, उत्पादनाची गुणवत्ता आणि कृषी निर्यातक्षमतेला मोठे बळ मिळणार असून भारतात सेंद्रिय आणि वनस्पतीजन्य पीकसंरक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन यादव म्हणाले, “ही मान्यता म्हणजे भारतीय संशोधनाचा, शाश्वत शेतीचा आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या विश्वासाचा सन्मान आहे. २०५० पर्यंत ‘प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न’ हे ध्येय पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि नवकल्पनांचा प्रवास यापुढेही अखंड सुरू राहील.”
केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून के.बी. बायो ऑरगॅनिक्सला मिळालेली ही मान्यता केवळ दोन उत्पादनांच्या नोंदणीपुरती मर्यादित नसून भारतीय संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान, सुरक्षित अन्न, सेंद्रिय शेती आणि आत्मनिर्भर कृषी व्यवस्थेला मिळालेले भक्कम बळ म्हणून कृषी क्षेत्रात एका महत्त्वपूर्ण मैलाच्या दगडाची नोंद ठरत आहे.





