आपलं फलटण प्रतिनिधी
“स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू करणारच,” असा ठाम इशारा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, संचालक मंडळातील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
आ.रामराजे पुढे म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी बहुमताने श्री दत्त इंडिया साखर कारखान्यासोबत भागीदारी तत्त्वावर कारखाना चालविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे हा प्रस्ताव रखडला असून, येणाऱ्या गळीत हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
यावेळी त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचवून जवाहर समूहावर दबाव आणून करार मोडण्याचा आणि श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व स्वतःच्या कारखान्याला फायदा व्हावा यासाठी श्रीराम कारखान्याचे भवितव्य पणाला लावण्याचा हा प्रयत्न सभासद कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत,” असे स्पष्ट केले.
“विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्या कुबडीचा आधार न घेता थेट जनतेसमोर यावे. सभासदांच्या भावनांशी खेळून कारखाना बंद करण्याचा प्रयत्न करू नये. श्रीराम हा सभासदांचा कारखाना आहे आणि तो सभासदांच्या बळावरच पुन्हा उभा राहील,” असेही रामराजे यांनी ठणकावून सांगितले.
यापूर्वी सभासद मेळाव्यात केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, सभासदांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली असून अवघ्या काही दिवसांत सुमारे एक कोटी रुपयांचे भागभांडवल उभे राहिले आहे. कारखाना कार्यालयात दररोज सभासदांची गर्दी होत असून हा प्रतिसाद श्रीरामबाबत सभासदांच्या असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे.
“सभासदांनी शेअर्सची रक्कम पूर्ण करावी. आवश्यक आर्थिक पाठबळ उभे करण्याची जबाबदारी माझी आहे. वित्तीय संस्थांशी चर्चा करून निधी उपलब्ध केला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत येणारा गळीत हंगाम सुरू केला जाईल,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, भागीदारीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असला तरी सभासदांचा वाढता प्रतिसाद आणि भागभांडवल उभारणीचा वेग पाहता ‘आपला कारखाना आपणच उभा करायचा’ हा निर्धार अधिक बळकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सभासदांच्या एकजुटीच्या बळावर श्रीराम सहकारी साखर कारखाना पुन्हा कार्यान्वित करण्याचा विश्वास रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सहकार मंत्री, सहकार आयुक्त व वरिष्ठ पातळीवर मंत्री स्तरावर सर्वच ठिकाणी कारखान्याच्या बाबतीत सकारात्मकता आहे. शासनाने एकाच वेळी तीन कारखान्यांच्या बाबत निर्णय घेण्यासाठी मंत्री स्तरावर बैठक घेतली त्यामध्ये अन्य दोन कारखान्यांना तत्परतेने आदेश देण्यात आले मात्र श्रीराम कारखान्याच्या बाबतीत निर्णय प्रक्रिया जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहे कारखाना सुरू करण्यात खरंतर कोणतीच अडचण नाही पण जाणीवपूर्वक निर्णय न देण्याने हा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे. यासाठी स्थानिक विरोधकांचा पत्रव्यवहार कारणीभूत असल्याचा सणसणाटी आरोप शेंडे यांनी केला







