आपलं फलटण | नवी दिल्ली, दि. १५ जुलै :
फलटण शहराला खड्डेमुक्त, सुबक आणि आधुनिक स्वरूप देण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून तब्बल ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने फलटणच्या विकासात आणखी एका महत्त्वाच्या अध्यायाची भर पडली आहे.

नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था निदर्शनास आणून देत भरीव निधीची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तातडीने ७० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देत संबंधित अधिकाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीदरम्यान रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विकासकामांबाबतचा पाठपुरावा गौरवत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, “निंबाळकरजींनी निधी मागितल्यावर नाही म्हणता येत नाही. रस्त्यांची कामे तातडीने मंजूर करून सहा महिन्यांत सुरू करावीत,” असे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
या नव्या मंजुरीमुळे फलटण शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते उच्च दर्जाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांमध्ये रूपांतरित होणार असून, नागरिकांना खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यापूर्वीही फलटण शहरातून जाणाऱ्या अंतर्गत पालखी महामार्गासाठी सुमारे ७५ कोटी रुपये, तसेच ‘मिसिंग मार्ग’ प्रकल्पासाठी ९७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आता त्यात आणखी ७० कोटी रुपयांची भर पडल्याने फलटणच्या रस्ते विकासासाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निधीचा आकडा लक्षणीयरीत्या वाढला आहे.

या निधी मंजुरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. “फलटण शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार कटिबद्ध आहे. नगरपरिषदेपासून राज्य आणि केंद्रापर्यंत विकासाभिमुख समन्वय असल्यामुळे फलटणला आवश्यक निधी सातत्याने उपलब्ध होत असून, आगामी काळातही विकासकामांसाठी अशीच मदत मिळत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
७० कोटी रुपयांच्या या निधीमुळे फलटण शहरातील रस्ते विकासाला नवी गती मिळणार असून, शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.





