आपलं फलटण | फलटण प्रतिनिधी
फलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आमदार सचिन पाटील यांनी पाणी साठवण योजनांच्या कामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. केवळ नियोजनावर न थांबता प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

महाराष्ट्र शासनाने फलटण तालुका दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) फलटण उपविभागांतर्गत येणाऱ्या १८ पाणी साठवण योजनांच्या कामांची आणि उपलब्ध पाणीसाठ्याची पाहणी केली. संभाव्य टंचाईग्रस्त गावांना साठवण तलावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि प्रलंबित कामांची सद्यःस्थिती यांचा त्यांनी आढावा घेतला.

पाहणीदरम्यान विडणी, निंबलक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे निदर्शनास आले. मात्र, सोनगाव आणि सरडे येथील तलावांना अद्याप विद्युतपुरवठा जोडण्यात आलेला नसल्याने ते रिकामे असल्याचे आढळले. शिंदेवाडी येथील तलावाच्या कामात विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे कामही प्रलंबित आहे.
या बाबींची गांभीर्याने दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोनगाव, सरडे आणि शिंदेवाडी येथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास नीरा उजवा कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अपूर्ण योजना लवकरच कार्यान्वित करण्यावर भर
होळ-खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी-फरांदवाडी येथील पाणी साठवण तलावांची कामे प्रगतिपथावर आहेत. या योजना लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना आमदारांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
भविष्यात एखाद्या गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यास साठवण तलावांमधील उपलब्ध पाण्याचा उपयोग करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईग्रस्त गावांची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आणि आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर धावपळ करण्याऐवजी आधीच उपाययोजना पूर्ण करण्यावर भर देत आमदार सचिन पाटील यांनी प्रत्यक्ष कामांचा आढावा घेतला. प्रलंबित कामे मार्गी लावून पाणी साठवण योजना कार्यान्वित झाल्यास टंचाईच्या काळात ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळू शकतो. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित गावांतील नागरिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.





