आपलं फलटण | फलटण
फलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी मुधोजी महाविद्यालयाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात मंडळाचे १७ वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विसाव्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ हा या परिषदेचा मुख्य विषय असून, स्थानिक इतिहासाच्या संशोधनाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाकडे पाहिले जात आहे.
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सातारा येथील प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे बीजभाषण करणार आहेत. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
इतिहास संशोधनातील योगदानाचा गौरव
इतिहास संशोधन आणि लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. आ. ह. साळंखे यांना सातारा इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून इतिहास संशोधन आणि लेखन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे.
नाईक-निंबाळकर घराण्याच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश
फलटण संस्थानाला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचे ऐतिहासिक संबंध राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी दीपाबाई आणि प्रथम पत्नी सईबाई यांचे नाईक-निंबाळकर घराण्याशी असलेले संबंध या ऐतिहासिक नात्याचे महत्त्व अधोरेखित करतात.
या पार्श्वभूमीवर संस्थानकालीन प्रशासनव्यवस्था, तत्कालीन राजकीय घडामोडी, घराण्याचा ऐतिहासिक वारसा आणि स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या भारतीय संघराज्यातील विलीनीकरणाची प्रक्रिया अशा विविध पैलूंचा अभ्यास परिषदेत केला जाणार आहे. शोधनिबंधांच्या माध्यमातून इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा चिकित्सक आढावा घेतला जाणार असल्याने इतिहास संशोधकांसाठी ही परिषद अभ्यासपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.
परिषदेच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते १० या वेळेत नावनोंदणी व अल्पोपाहाराने होईल. सकाळी १० ते १०.३० या वेळेत उद्घाटन समारंभ, तर १०.३० ते ११.३० या वेळेत बीजभाषण होणार आहे. त्यानंतर शोधनिबंध वाचनाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. दुपारच्या भोजनानंतर २.३० ते ४ या वेळेत शोधनिबंध वाचनाचे पुढील सत्र होईल.
सायंकाळी ४ वाजता समारोप समारंभ होणार असून, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेमुळे विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना संशोधनात्मक विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. फलटण संस्थानाच्या ऐतिहासिक वारशाचे दस्तऐवजीकरण, उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा अभ्यास आणि स्थानिक इतिहासाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रक्रिया यांना या अधिवेशनामुळे चालना मिळू शकते.
परिषदेचे संयोजक डॉ. ए. एस. टिके, समन्वयक प्रा. (डॉ.) एस. टी. कदम आणि प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. फलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा संशोधनाच्या व्यासपीठावर आणणे आणि इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे, हा परिषदेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहासप्रेमी, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





