फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला अपेक्षित दर मिळत नसल्याने संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला असून अनेक कारखाने तोट्यात चालवावे लागत असल्याची खंत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
श्रीराम कारखान्यात 35 ते 40 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या 14 कामगारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले, संचालक मंडळ, कामगार युनियनचे पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
संजीवराजे पुढे म्हणाले, साखरेच्या दरावरील धोरणांमुळे अनेक नामांकित साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. साखर उद्योग टिकविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साखरेच्या दराबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. श्रीराम कारखाना अखंडित सुरू राहावा यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून कामगार, सभासद आणि ऊस उत्पादकांनीही एकजुटीने साथ देणे गरजेचे आहे.
डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले की, राजघराण्याने पुढाकार घेतल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला श्रीराम कारखाना उभारी घेऊ शकला. गेल्या अनेक वर्षांत कामगारांची थकीत देणी, पगार व बोनस नियमितपणे देण्यात आले असून कारखाना सुरू राहण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे.
कामगार युनियनचे नेते प्रेमजीत काटे यांनी, कारखाना बंद पडल्यास कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच कारखाना सुरू ठेवण्यासाठी कामगारांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
समारंभात प्रेमजीत प्रभाकर काटे, नामदेव नाळे, पंढरीनाथ ढोले, विठ्ठल शिंदे, भानुदास रणदिवे, मारुती ढोले, दिलीप धुमाळ, शांतीलाल रणदिवे, रवि जाधव, संपत ननवरे, अंकुश बर्गे, मधुकर गावडे आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
छायाचित्र : प्रेमजीत काटे यांचा सत्कार करताना संजीवराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे व मान्यवर.





