आपलं फलटण प्रतिनिधी :
फळपिकांना योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करून उत्पादन व झाडांची वाढ सुधारण्यासाठी ‘रिंग पद्धत’ या विषयावर कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
यावेळी कृषीकन्यांनी सांगितले की, या पद्धतीमध्ये झाडाभोवती १० ते ६० सेंटीमीटर अंतरावर गोलाकार चर (रिंग) तयार करून त्यामध्ये जैविक किंवा रासायनिक खत टाकले जाते. त्यामुळे खत थेट मुळांपर्यंत पोहोचून त्याचा कार्यक्षम वापर होतो. परिणामी झाडांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे होते, वाढ जोमदार होते आणि उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत मिळते.
प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनीही या पद्धतीबाबत उत्सुकता व्यक्त केली. “यापूर्वी खत झाडाभोवती विखुरले जात होते; मात्र रिंग पद्धतीमुळे खताची कार्यक्षमता वाढून झाडांच्या वाढीत लक्षणीय सुधारणा दिसून येते,” अशी माहिती कृषीकन्यांनी दिली.
हे प्रशिक्षण कृषीकन्या तेजश्री जाधव, वैभवी ननावरे, वैष्णवी वाघमारे, अस्मिता काटकर, सिद्धी धुमाळ, कावेरी पळसकर आणि सुवर्णा धिंदळे यांनी दिले.
सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा थालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित तसेच मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विषयाचे मार्गदर्शक प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.






