आपलं फलटण ( प्रतिनिधी)
आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज होत असतानाच, निसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल सध्या पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध करून सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे नम्र आवाहन केले आहे.
आळंदीत येणे सध्या सुरक्षित नाही!
इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे सध्या आळंदी शहरात प्रवेश करणे अत्यंत धोक्याचे आणि असुरक्षित बनले आहे. मुख्याधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की, सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाविकांनी तूर्तास आळंदीच्या दिशेने प्रवास करणे टाळावे.
आहात तिथेच सुरक्षित थांबा: ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी धोका पत्करून पुढे न येता, सध्या ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे.
नदीपात्र व घाटावर जाणे टाळा: नदीपात्र, घाट परिसर तसेच प्रशासनाने बंद केलेल्या पुलांकडे नागरिकांनी आणि भाविकांनी फिरकू नये.
अफवांवर विश्वास ठेवू नका: आपत्तीच्या या काळात सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
प्रशासनाला सहकार्य करा: पोलीस यंत्रणा, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्व आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर करत आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती आळंदी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.






