आपलं फलटण( प्रतिनिधी ) “एखाद्या व्यक्तीला खूश करण्यासाठी सत्तेचा गैरवापर होत असेल, प्रशासनाची साथ मिळत नसेल आणि न्यायच रोखला जात असेल, तर न्याय सहज मिळणार नाही. तो संघर्ष करून मिळवावा लागेल, प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय ओरबाडून घ्यावा लागेल. श्रीरामच्या सभासदांनी आणि तालुक्यातील जनतेने संघर्षाचा निर्णय घेतला तर त्या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरण्यास तयार आहे,” असा ठाम इशारा आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला.
क्षश्रीरामक्ष सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला माजी आमदार दीपकराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन शाहूराज भोसले, संचालक मंडळ, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो सभासद उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, श्रीरामच्या सुमारे १४ हजार सभासदांपैकी १२ हजार सभासदांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे शेअर भांडवल पूर्ण केल्यास सुमारे १२ कोटी रुपयांचे भांडवल उभे राहील. त्यामुळे कारखान्याचे नक्तमूल्य वाढेल आणि त्याच्या बळावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याची त्यांनी ग्वाही दिली.सभासदांना सलग सात वर्षे दरवर्षी केवळ दोन हजार रुपये भरावे लागतील. गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येईल. आगामी आठ दिवसांत प्रत्येक सभासदाने हा निर्णय प्रत्यक्षात उतरवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कारखान्याच्या प्रश्नावर अंतिम निर्णय सभासदांनीच घ्यायचा आहे. तुम्ही ठामपणे उभे राहिलात, संघर्षासाठी तयार राहिलात तर मी तुमच्या पाठीशी उभा राहीन; मात्र तात्पुरत्या फायद्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारला तर या प्रश्नातून बाहेर पडेन, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
श्रीराम हा केवळ साखर कारखाना नाही. तो हजारो शेतकरी, ऊसतोड कामगार आणि कामगारांच्या संसाराचा आधार आहे. स्वर्गीय मालोजीराजे राजेसाहेबांनी उभारलेली ही सहकाराची परंपरा पुन्हा पूर्ववैभवात आणणे हेच आमचे ध्येय आहे. गेली ३० ते ३५ वर्षे स्वतःच्या कुटुंबापेक्षा शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी आयुष्य दिले,” असे सांगत त्यांनी भावनिक साद घातली.
सन १९५७ ते १९७८ या काळात श्रीराम आदर्श पद्धतीने चालत होता. त्यानंतर सहकारात “१+१ = ११” असे चुकीचे गणित मांडले गेले आणि वाढलेल्या स्वार्थामुळे सहकार संकटात सापडला. मात्र कोणावर सूड उगविण्याऐवजी सर्वांना सोबत घेऊन कारखाना वाचविण्याचा प्रयत्न आम्ही केला.
विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये पैसा, दहशत आणि सत्तेचा वापर करून विजय मिळविण्यात आला. विरोधकांकडे लोकमत नाही आणि ते कधीही मिळणार नाही. आता सत्तेच्या दबावातून श्रीराम कारखानाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घनाघाती आरोप त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाशी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे वैयक्तिक वैर नाही. उलट त्यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. ते पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते आहेत. मात्र एखाद्याच्या राजकीय समाधानासाठी आमच्या गरीब सभासदांचा संसार उद्ध्वस्त होईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले.
तालुक्यासाठी केलेल्या विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात पोहोचविणे, कमिन्ससारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा उद्योग आणणे, बंद पडलेले दोन्ही साखर कारखाने पुन्हा सुरू करणे यांचा उल्लेख केला. “आता आणखी काय सोने वाटू?” असा सवाल करत विकास टिकविण्यासाठी जनतेने साथ देण्याचे आवाहन केले.
कोरोना काळातील मदत, तीन पिढ्यांची सेवा आणि ३०-३५ वर्षांच्या संघर्षाचा उल्लेख करताना त्यांनी, “झालेला पराभव हा आमचा वैयक्तिक पराभव नाही; तो आम्ही केलेल्या त्यागाचा आणि श्रमांचा पराभव आहे,” असे भावनिक वक्तव्य केले.
पूर्वी मतभेद होते; पण सहकारावर कधी राजकारण झाले नाही: संजीवराजे

माजी जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी इतिहासाची आठवण करून देताना सांगितले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव मोहिते आणि मालोजीराजे यांच्यात मतभेद होते; परंतु त्या मतभेदांचा परिणाम कधीही सहकार चळवळीवर किंवा निर्णय प्रक्रियेवर होऊ दिला गेला नाही.यशवंतराव चव्हाण यांनी यशवंतराव मोहिते यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केला. आज मात्र संकुचित राजकारणातून सहकारी संस्थांना लक्ष्य केले जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
खाजगी साखर कारखानदारीत शेतकऱ्यांच्या हिताला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप करत, सहकारी कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर, कामगारांना वेळेवर वेतन आणि सभासदांचे हित जपतात, असे त्यांनी सांगितले.
श्रीराम कारखान्याच्या निर्णयाला न्यायालय आणि अधिकाऱ्यांची मान्यता मिळालेली असतानाही केवळ राजकीय कारणांमुळे प्रक्रिया लांबविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चुकीच्या राजकीय दबावामुळे कारखाना अडचणीत येत असून आता सभासदांनी एकजुटीने संघर्षासाठी तयार राहण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरवर सकारात्मकता, प्रत्यक्षात अडथळे: दीपक चव्हाण

माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की, मुख्यमंत्री चर्चेत सकारात्मकता दाखवतात; मात्र प्रत्यक्षात काही व्यक्तींच्या सांगण्यावरून श्रीराम सुरू होऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले जात आहेत.
हा संपूर्ण प्रकार राजकीय कटकारस्थान असून तो सभासदांच्या एकजुटीने हाणून पाडला पाहिजे. श्रीराम सुरू राहणे ही काळाची गरज आहे. आम्ही कारखाना सुरू व्हावा, सहकार वाचवा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे हेलपाटे घालत घालतोय तर कारखाना बंद पडावा म्हणून विरोधकांची टोळी प्रयत्न करतेय हे मोठे दुर्दैव आहे. साखरवाडी कारखान्यामुळे त्या परिसराचा विकास झाला; त्याचप्रमाणे श्रीरामही सुरू राहणे तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
एकाच व्यासपीठावर चर्चा करा; जनतेची दिशाभूल थांबवा: गिरीश बनकर

जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना म्हटले की, करारातील दोनशे रुपये शेतकऱ्यांना दिले नाहीत, अशा प्रकारचे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जर आरोप खरे असतील तर दहा ठिकाणी बोलण्याऐवजी एकाच व्यासपीठावर समोरासमोर चर्चा करावी. वस्तुस्थिती जनतेसमोर येईल अत्यंत त्यागातून उभा राहिलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयालाच विरोध करणारे पत्र राज्य सरकारकडून काढले जाणे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी नेहमी जनहिताचे निर्णय घेतले; मात्र आज दस्तूर खुद्द मुख्यमंत्री काही निर्णय हे एखाद्या व्यक्तीच्या राजकीय फायद्यासाठी घेत असल्याचा सूर त्यांनी व्यक्त केला हे राज्याचं दुर्दैव म्हणायचं की काय? असावा सवालही त्यांनी केला. प्रशासनही या प्रक्रियेला विरोध करत असून विरोधक संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा दावा त्यांनी केला.

सभासदांचा एकमुखी निर्धार
प्रास्ताविकात संचालक संतोष खटके यांनी गेल्या दीड वर्षातील सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेताना विरोधकांना काहीही करून हा कारखाना बंद पाडायचा आहे असा गंभीर आरोप केला तर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी विरोधक स्वार्थी राजकारणातून शेतकरी आणि कामगारांचे नुकसान करीत असल्याचा आरोप केला.
सभेच्या अखेरीस उपस्थित हजारो सभासदांनी हात उंचावून श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेअर भांडवल उभारणीसह सर्वतोपरी सहकार्य करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले, तर आभार संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी मानले.






