आपलं फलटण वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यासह राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता घाटरस्त्यांनाही बसू लागला असून, फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात बारामती येथील चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटरस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पोपट जगताप (रा. बारामती) हे चारचाकी वाहनातून ताथवडे घाटातून प्रवास करत असताना अचानक डोंगरावरून मोठे दगड कोसळले. त्यातील एक मोठा दगड थेट वाहनाच्या बोनेटवर आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व वाहन रस्त्यालगतच्या खांबावर जोरदार धडकले. या भीषण अपघातात योगेश जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. ताथवडे घाटासह इतर घाटरस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक तपास महिला पोलीस जाधव करीत आहेत
चौकट
वडिलांच्या डोळ्यांसमोर मुलाचा दुर्दैवी अंत!
ताथवडे घाटातील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे मृत चालकासोबत त्यांचे वडीलही वाहनात प्रवास करत होते. अचानक डोंगरावरून दरड कोसळून दगड वाहनावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना वडिलांच्या डोळ्यांसमोर घडल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसला. क्षणभरात काळाने घाला घालत त्यांच्या समोरच मुलाचा जीव गेल्याने उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.






