फलटण (आपलं फलटण)
तालुक्यातील जिंती येथील राघव राहुल रणवरे या इयत्ता दुसरीतील चिमुकल्याने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 150 पैकी तब्बल 148 गुण मिळवत राघवने हे यश मिळवले आहे.
जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या राघवच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून गावासह सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे. लहान वयातच दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती यामुळे राघव विशेष ठरला आहे. त्याच्या यशामध्ये आई-वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
दरम्यान, मंथन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे आयोजित ही राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास चालना देणे, सामान्य ज्ञान वाढवणे व विचारक्षमतेला वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
राघवच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिंती येथील सर्व शिक्षकांनी त्याचा सत्कार करून गौरव केला.






