आपलं फलटण (प्रतिनिधी )राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, स्त्रीशक्ती, संस्कार आणि जलसंवर्धनाच्या विचारांचा जागर समाजात व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ विचारज्योत व जलपूजन रथयात्रेचे फलटण शहरात सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा दणदणाट, भगव्या पताकांनी सजलेला परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषांनी संपूर्ण फलटण नगरी शिवमय झाली होती.
राजे लखोजीराव जाधवराव यांच्या वंशजांच्या पुढाकारातून मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक पाच विहिरींचे पवित्र जल आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांची ज्योत घेऊन रविवारी (दि. ५) सुरू झालेली ही रथयात्रा सोमवारी सकाळी फलटणमधील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात दाखल झाली. यावेळी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्यासह विविध मान्यवरांनी रथाचे पूजन करून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या श्रद्धा व उत्साहाने रथयात्रेचे स्वागत केले.
यानंतर रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. पुढे महाराजा मंगल कार्यालय येथे रथयात्रेचा काही काळ मुक्काम झाला. या काळात शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी रथयात्रेचे दर्शन घेत राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांना अभिवादन केले. दुपारनंतर रथयात्रा पुढील प्रवासासाठी लोणंदच्या दिशेने रवाना झाली.
यावेळी भागवतराजे जाधवराव यांनी रथयात्रेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, ही यात्रा केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक नसून समाजात राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, स्त्रीशक्ती, संस्कार आणि जलसंवर्धनाचा व्यापक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. “पाणी हेच जीवन असून जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी विचारज्योत व जलपूजन रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ म्हणून ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या फलटणमध्ये या रथयात्रेच्या स्वागतासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला, युवक, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगव्या ध्वजांनी सजलेले शहर, पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद आणि शिवमय वातावरणामुळे फलटणमध्ये प्रेरणादायी उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.






