फलटण (आपलं फलटण) गिरवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ विठ्ठल जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी निवडीनंतर व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी नवनाथ जाधव यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
निवडीनंतर बोलताना नवनाथ जाधव यांनी गिरवी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतीमार्फत विकासकामांना गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनीही सह्याद्री भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करून गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच नवनाथ जाधव यांच्यावर ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.






