फलटण (आपलं फलटण) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका निष्पाप बालिकेवर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात संतापाची लाट उसळली असून, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (नाशिक केंद्र) फलटणच्या वतीने आज शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
या वेळी संतप्त नागरिकांनी “त्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या,” अशा तीव्र शब्दांत आपला रोष व्यक्त केला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. निषेध सभेत उपस्थितांनी समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत अशा घटनांची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
इतिहासाचा दाखला देत वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनिष्ठ कारभाराची आठवण करून दिली. “ज्याप्रमाणे महाराजांनी रांजाच्या पाटलाला त्याच्या गुन्ह्याबद्दल कठोर शिक्षा दिली, त्याच धर्तीवर या आरोपीलाही कठोरात कठोर शिक्षा देऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा,” अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ‘शक्ती’ कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही जोर धरत होती. महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना त्वरित न्यायालयीन शिक्षा होण्यासाठी शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. “या प्रकरणात सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावावी, हीच संपूर्ण फलटणकरांची भावना आहे,” असेही यावेळी ठामपणे सांगण्यात आले.
निषेध सभेला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी बांधव, सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत या अमानुष घटनेचा निषेध नोंदवला. फलटणकरांच्या एकजुटीतून उमटलेला हा संताप शासनासाठी इशारा मानला जात आहे.






