फलटण (आपलं फलटण)केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ व्या जनगणनेच्या प्रक्रियेला दि. १ मेपासून सुरुवात झाली असून, त्याअनुषंगाने फलटण नगरपरिषद हद्दीतील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि. ५ ते ७ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाच्या वेळापत्रकावरून वाद निर्माण झाला आहे.
सद्यस्थितीत तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना, प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घ्यावे, अशी मागणी शहरातील शिक्षक संघटनांनी केली होती. परंतु, फलटण नगरपरिषद प्रशासनाने ही मागणी नाकारत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या पूर्ण दिवसभराच्या वेळेतच प्रशिक्षण घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
दरम्यान, फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे जनगणना प्रशिक्षण तीन टप्प्यांत सकाळच्या सत्रात पार पडले असताना, शहरातील शिक्षकांबाबत असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, उष्णतेमुळे एखाद्या शिक्षकास उष्माघाताचा त्रास झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट प्रश्नही प्रशासनाला विचारण्यात आला आहे.
फलटण शहरातील १३ प्रभागांमध्ये जनगणना कार्यासाठी एकूण ९२ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना ५ ते ७ मे दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना, दिवसभराचे प्रशिक्षण ठेवण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्याच महिन्यात पिंपळगाव रोठा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे एका शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही प्रशासनाने संवेदनशीलतेचा अभाव दाखवल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्याने प्रशिक्षणाच्या वेळेबाबतची माहिती तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येणार असल्याचे फलटण शहर शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन
आपलं फलटण (समाधान कळसकर) : फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच ऊसदर देण्यात येईल. तसेच आगामी गळीत हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न…






