सातारा (आपलं फलटण)
सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक, निष्पक्ष व लोकाभिमुख करण्याचा ठाम निर्धार नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, त्यांच्या समस्या तत्काळ सोडविल्या जातील आणि गुन्हेगारीला प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही नूतन जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना दिलनिखिल पिंगळे यांनी नुकताच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचे स्वरूप आणि त्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. विशेषतः शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
यावेळी त्यांनी सांगितले की, यापूर्वी विविध जिल्ह्यांत काम करताना मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर साताऱ्यात अधिक परिणामकारक कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांचा विश्वास संपादन करणे हे पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.
दरम्यान, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही अधिक चांगल्या कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त करताना पिंगळे म्हणाले की, संघटित गुन्हेगारी, जुगार, मटका, अवैध धंदे यांसारख्या बाबींवर कठोर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नव्या पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक गतिमान होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






