फलटण: आपलं फलटण: गोखळी, ता. फलटण : सहकार, विश्वास, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा आधार घेत गोखळी येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने यशस्वी वाटचालीची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने रौप्यमहोत्सव सोहळा व सहकार सप्ताह विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. मेखळी, ता. बारामती येथील त्रिमूर्ती लॉन्स येथे सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत हा सोहळा होणार असून, सहकार क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, सभासद आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत संस्थेच्या २५ वर्षांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी दिली

संस्थेच्या या रौप्यमहोत्सवी सोहळ्यास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोकाटे, फेडरेशनचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, सातारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे , सईबाई महाराज पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका भारतीताई राजेंद्र मुथा, फलटणचे सहाय्यक निबंधक दाजी खताळ आणि फेडरेशनच्या निमंत्रित सदस्या क्रांती शितोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच विशेष निमंत्रित मान्यवर म्हणून माजी प्रादेशिक उपनिबंधक (साखर), सोलापूर जे. पी. गावडे, नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअर (इंडिया) प्रा. लि., नाशिकचे व्हाइस प्रेसिडेंट (सेल्स अँड मार्केटिंग) मसऊद अत्तार आणि सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक बी. एच.क्षिरसागर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते १० या वेळेत संगीत मनोरंजनाने होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या पहिल्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, दीपप्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार, स्मरणिकेतील पुस्तकाचे अनावरण, संस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर आधारित चित्रफितीचे सादरीकरण तसेच मान्यवरांची मनोगते व स्नेहभोजन असे कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २.३० ते ४.३० या दुसऱ्या सत्रात महिलांसाठी विशेष मार्गदर्शन, सर्व सभासदांना भेटवस्तू वितरण तसेच संस्थेचे माजी संचालक आणि विशेष निमंत्रित सभासदांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीत सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचारीवृंदाची मेहनत आणि सहकार क्षेत्रातील मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. ग्रामीण भागातील आर्थिक गरजा ओळखून सभासदांना आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देतानाच आर्थिक शिस्त, परस्पर विश्वास आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा प्रयत्न या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.
या सोहळ्यास सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्रामस्थ आणि सहकारप्रेमींनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारीवृंदाच्या वतीने करण्यात आले आहे.






