फलटण : आपलं फलटण: सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड आणि सामूहिक प्रयत्नांना रुग्णहिताची दिशा मिळाली की आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवे विक्रम घडतात, याचा प्रत्यय लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलने दिला आहे. या हॉस्पिटलमध्ये एकाच दिवसात तब्बल ३७ यशस्वी फेको नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या. फलटणच्या नेत्रसेवेच्या क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुन घाडगे, सचिव चंद्रकांत कदम, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने रुग्णसेवेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या एकत्रित परिश्रमांचे फलित म्हणून हॉस्पिटलने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
मोतीबिंदूच्या रुग्णांना आधुनिक फेको शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देत फलटण शहर व तालुक्यासह शेजारील भागातील रुग्णांना दर्जेदार नेत्रोपचार देण्याचे काम हॉस्पिटल करीत आहे. अत्याधुनिक उपचारपद्धती, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे या हॉस्पिटलने परिसरातील रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.
एका दिवसात ३७ शस्त्रक्रिया पूर्ण होणे ही केवळ संख्यात्मक कामगिरी नसून त्यामागे डॉक्टरांचे कौशल्य, परिचारिकांची तत्परता, तांत्रिक कर्मचाऱ्यांची दक्षता आणि व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन आहे. रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टीचा आनंद मिळावा, या ध्येयाने कार्यरत असलेल्या संपूर्ण टीमच्या समर्पणाचा हा गौरवपूर्ण क्षण आहे.

गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचे सेवाव्रत अधिक व्यापक करण्याचा निर्धार लायन्स परिवाराने व्यक्त केला आहे. रुग्णसेवेचा ध्यास, आधुनिक उपचारांचा विश्वास आणि सेवाभावाची अखंड ज्योत यांचा संगम असलेल्या लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलची ही कामगिरी फलटणच्या आरोग्यसेवेसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.





