फलटण: आपलं फलटण : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे अडीच हजार किलोमीटरची सायकल वारी शनिवारी (दि. २१) सुरू झाली. सायंकाळी ही वारी फलटण येथे मुक्कामी येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथील विश्रामगृहात वारीचा शुभारंभ झाला . सायकल वारीमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील सुमारे १६० सायकल रायडर्स सहभागी होणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमिटी (घुमाण), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने २०२२ पासून या उपक्रमाचे आयोजन केले जात असून, यंदा पाचवे वर्ष आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब या पाच राज्यांतून प्रवास करीत ही वारी १३ डिसेंबरला घुमाण येथे पोहोचणार आहे. तेथे सायकल वारीचा समारोप होईल. दरम्यान, रथयात्रा पुढे चार राज्यांतून प्रवास करून २१ डिसेंबरला पंढरपूर येथे परतणार आहे.
या वारीच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार-प्रसार करण्याबरोबरच आरोग्य, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि शिक्षणाबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे भिसे यांनी सांगितले.
यावेळी पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव अॅड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, गणेश उंडाळे, सायकल रायडर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र पिसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.





