फलटण : आपलं फलटण :विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फलटण येथे ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद, सातारा पंचायत समिती, फलटण (शिक्षण विभाग) आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २५ ते शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात होणाऱ्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना, प्रयोग, उपकरणे आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.

बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सहभागी विद्यार्थी व उपक्रमांची नोंदणी होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत साहित्य व उपक्रमांची मांडणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आमदार सचिन पाटील आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी पंचायत समिती फलटणचे उपसभापती अमोल दशरथ सस्ते, पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत प्रदर्शनातील उपकरणांची पाहणी व परीक्षण होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, विचारक्षमतेला आणि अभिव्यक्ती कौशल्याला वाव मिळणार आहे.

शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत उपकरणांची पाहणी व परीक्षण होईल. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व संशोधक प्रा. डॉ. युवराज लक्ष्मण गायकवाड यांचे व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी दुपारी २ ते ४ या वेळेत होणार असून, माजी खासदार तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभास पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले, सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना व माध्यमिक) शबनम मुजावर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती तेजस्विनी विक्रमशील कदम, फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, पंचायत समितीचे उपसभापती अमोल दशरथ सस्ते, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) आणि अध्यक्षा सौ. सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनासाठी सात प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये उत्तम जीवनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा व पर्यावरण संवर्धन, गणितीय उपकरणे व संगणकीय विचार, आरोग्य व स्वच्छता, देशी व स्थानिक कृषी पद्धती, ग्रामीण परिवर्तनासाठी विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञानापासून शेती, पर्यावरण, आरोग्य आणि ग्रामीण विकासापर्यंतच्या विविध विषयांना विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून प्रत्यक्ष स्वरूप देण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध होणार आहे.
उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता सहावी ते आठवी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयावर आधारित वैज्ञानिक प्रतिकृती, प्रयोग, उपकरणे आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करून सादर करावेत, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ विज्ञानातील ज्ञान सादर करण्याचीच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण, चिकित्सक विचार आणि संशोधनाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याबरोबरच विज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके)

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महत्त्वाची संधी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून विज्ञान समजून घ्यावे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी केले आहे.
सातारा जिल्हा परिषद, सातारा पंचायत समिती, फलटण (शिक्षण विभाग) आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २५ ते शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनासाठी निश्चित करण्यात आलेल्या सात विषयांमध्ये उत्तम जीवनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा व पर्यावरण संवर्धन, गणितीय उपकरणे व संगणकीय विचार, आरोग्य व स्वच्छता, देशी व स्थानिक कृषी पद्धती, ग्रामीण परिवर्तनासाठी विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता सहावी ते आठवी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनीही कोणत्याही एका विषयावर आधारित वैज्ञानिक प्रतिकृती, प्रयोग, उपकरणे आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करून सादर करावेत. त्याचबरोबर प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही सहभाग घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणे, विज्ञानातील नवीन संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजावून घेणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा देणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमात त्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी केले आहे.





