फलटण : आपलं फलटण
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे आयोजित ‘इनोव्हेशन २के२६’ आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘हॅकाथॉन २०२६’ या तंत्रज्ञान व प्रकल्प स्पर्धांनी फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला. राज्यासह देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांमधील ५४४ संघांच्या तब्बल २३४८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना फलटण तालुक्यातील ४५०० हून अधिक विद्यार्थी, पालक, शेतकरी आणि नागरिकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बक्षीस वितरण समारंभाला आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर प्रमुख उपस्थित होते, तर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीचे कौतुक केले. तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ स्पर्धा जिंकण्यासाठी न करता समाजातील तळागाळातील समस्या सोडविण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान महत्त्वाचे असून अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी नमूद केले.
‘इनोव्हेशन २के२६’च्या पदवी विभागात जे.एस.सी.ओ.ई. हडपसर आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर पुणे यांच्या संघांनी संयुक्तपणे विजेतेपद पटकावले. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणच्या ‘स्मार्ट कॉलेज बेल’ प्रकल्पासह मुंबईच्या एस.आय.ई.एस. ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘डिव्हाईन फ्युएल’ प्रकल्पाने उपविजेतेपद मिळवले. विशेष पुरस्कारांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर, एस.एस.व्ही.पी.एस. बी.एस. देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे, विद्या प्रतिष्ठान बारामती आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व जेएसपीएम युनिव्हर्सिटी वाघोली येथील विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले.
राष्ट्रीय स्तरावरील ‘हॅकाथॉन २०२६’मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे यांच्या संघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला. गारगोटी येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग आणि बंगळुरूच्या एम.एस. रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघांनी उपविजेतेपद संपादन केले. विशेष पुरस्कारांमध्ये नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण, विद्या प्रतिष्ठान बारामती, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणच्या भूमी देवकाते, ऐश्वर्या कदम आणि अंजली कदम यांच्या ‘स्मार्ट रुरल हेल्थकेअर असिस्टंट’ या प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख प्रवाहाचा पुरस्कार मिळाला.
‘इनोव्हेशन २के२६’च्या पदविका विभागात अशोकराव माने तंत्रनिकेतन वाठार आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संघांनी संयुक्तपणे विजेतेपद पटकावले. परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टी आणि फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला यांच्या संघांना उपविजेतेपद मिळाले. या विभागातील विशेष पुरस्कारांमध्ये एसव्हीपीएम्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी माळेगाव बुद्रुक, जील तंत्रनिकेतन पुणे, श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पनोरी, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतन लोहगाव आणि अमृतवाहिनी तंत्रनिकेतन संगमनेर येथील विद्यार्थ्यांनी विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
या स्पर्धांमधील प्रकल्पांचे विषयही विशेष लक्षवेधी ठरले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आरोग्यसेवा, महिला सुरक्षा, खाणकामातील सुरक्षितता, नैसर्गिक आपत्तींचा पूर्वइशारा, शेतीमालाला बाजारपेठ जोडणी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी वायरलेस चार्जिंग, दिव्यांगांसाठी एआय व्हीलचेअर आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थापन अशा समाजोपयोगी संकल्पनांचा विद्यार्थ्यांनी प्रभावी आविष्कार सादर केला. त्यामुळे या स्पर्धा केवळ तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन न राहता सामाजिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचे व्यासपीठ ठरल्या.
कार्यक्रमास महाविद्यालय गव्हर्निंग बॉडीचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. मनोजकुमार दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. दळवी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.








