आपलं फलटण( प्रतिनिधी) युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश रुजविणे, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमागील प्रेरणास्रोत असलेल्या मातृशक्तीचे स्मरण जपणे या उदात्त हेतूने व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्यावतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा ते पाचाड अशी १४ दिवसांची ऐतिहासिक पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या पदयात्रेत राज्यभरातील शिवप्रेमी युवक सहभागी होणार असून, ही मोहीम प्रेरणा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम ठरणार आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथून दि. २५ जून रोजी पदयात्रेला प्रारंभ होणार असून, दि. ९ जुलै रोजी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील समाधीस्थळी यात्रेचा समारोप होणार आहे. दररोज सुमारे ३५ किलोमीटर अंतर पायी पार करत ही यात्रा इतिहासाच्या पाऊलखुणा जपत पुढे सरकणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडविणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याची बीजे रोवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य संपन्नता आणि व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा निर्माण करणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ही पदयात्रा केवळ प्रवास नसून संस्कार, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरणार आहे.
व्यसनमुक्त युवक संघाने यापूर्वीही आग्रा ते राजगड ही सुमारे १,४०० किलोमीटरची ऐतिहासिक पदयात्रा, संगमेश्वर ते तुळापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शक्तीज्योत शौर्ययात्रा, पन्हाळगड ते विशाळगड अशा विविध साहसी आणि ऐतिहासिक मोहिमा यशस्वीपणे राबविल्या आहेत. या सर्व उपक्रमांना युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, समाजमनात इतिहासाबद्दल अभिमान आणि राष्ट्रप्रेम जागविण्यात या मोहिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दि. २५ जून रोजी सुरु होत असलेल्या या पदयात्रेत सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आदी जिल्ह्यांतील व्यसनमुक्त युवक सहभागी होणार आहेत. सिंदखेडराजा, जालना, गाडे जळगाव, छावणी संभाजीनगर, गणेशवाडी, कांगोणी फाटा, अहिल्यानगर, सुपे, रांजणगाव, वाघोली, गोऱ्हे, वेल्हे, मढेघाट, वाकी मार्गे पाचाड असा यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वेल्हेपासून पुढे डोंगर-दऱ्यांमधील पाऊल वाटेने प्रवास करत मढेघाटातून रायगड जिल्ह्यात प्रवेश केला जाणार आहे.
पदयात्रेच्या संपूर्ण मार्गावर विविध गावांतील ग्रामस्थांकडून नाश्ता, भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, स्थानिक नागरिकही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होणार आहेत. इतिहास, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडविणाऱ्या या पदयात्रेत शिवप्रेमी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे मार्गदर्शक प्रमोद भापकर यांनी केले आहे.
या मोहिमेबाबतची माहिती संघटनेचे माजी अध्यक्ष शहाजी काळे, आनंदराव निकम, विद्यमान अध्यक्ष दीपक जाधव, नवनाथ मालुसरे, संजय पराडे, महादेव यादव, बाळासाहेब कासारे, प्रा. मारुती शेळके, भानुदास वैरट, शरद रायते आणि समाधान सूर्यवंशी यांनी दिली आहे.







