फलटण, दि. २६ : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयात गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी ‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’ या विशेष आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माय भारत (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट ऑनलाइन संवाद साधण्याची व त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची मिळणारी संधी होय.
युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करणे, शिस्त व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणे तसेच युवकांचा क्रीडा उपक्रमांतील सहभाग वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सातारा जिल्ह्यातून मुधोजी महाविद्यालय, फलटण आणि दहिवडी कॉलेज, दहिवडी या दोन महाविद्यालयांची या उपक्रमासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील युवकांशी संवाद साधताना क्रीडा, फिटनेस, युवकांचा सहभाग आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुधोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, शिस्त आणि निरोगी समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित होणार आहे.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले आहे.
फोटो : मुधोजी महाविद्यालय, फलटणची प्रशस्त इमारत.




