फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी :
फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत संबंधित खाजगी संशयित एजंट विकास शंकर तोडकर. नांदल तालुका फलटण यास ताब्यात घेण्यात आले आहे.तक्रारदाराकडून रकमेतील काही हिस्सा स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फलटण पूर्व भागातील एका गावातील शेतकऱ्याच्या कामकाजासंदर्भात संबंधित संशयित खाजगी एजंटाने ‘तुमचे काम करून देतो’ असे सांगून त्यासाठी ५० हजार रुपयांची रक्कम निश्चित केल्याचे तक्रारीत नमूद असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी काही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून संबंधित एजंटला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीकडून तिची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर नियोजनबद्धरीत्या सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवाईसाठी सातारा एसीबीचे अधिकारी व कर्मचारी फलटणमध्ये दाखल झाले होते. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारीही एसीबीच्या पथकाच्या मदतीसाठी उपलब्ध होते.
दरम्यान, संबंधित प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लाचेची मागणी नेमकी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती का? संबंधित प्रकरणात कोणत्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचा संबंध आहे का?यासह अन्य बाबींचा तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणातील कारवाईबाबत एसीबीकडून अधिकृत माहिती आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तपास पूर्ण होऊन न्यायालयीन प्रक्रिया होईपर्यंत संबंधित व्यक्ती अथवा अन्य कोणालाही दोषी ठरविता येणार नाही.
शासकीय काम करून देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थ अथवा खाजगी व्यक्तीकडून पैशांची मागणी होत असल्यास नागरिकांनी संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




