फलटण: आपलं फलटण :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर बँकेचा प्रदीर्घ अनुभव, सहकार क्षेत्रातील जाण आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर बँकेची उज्ज्वल परंपरा अधिक समर्थपणे पुढे नेण्याचा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. बँकेचा कारभार सक्षम, शिस्तबद्ध आणि पारदर्शक ठेवण्यासाठी आपल्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी पक्षीय राजकारणापेक्षा समविचारी नेतृत्व आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत फलटण तालुका विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघात संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात प्रतिष्ठेची आणि अटीतटीची लढत झाली. या लढतीत संजीवराजे यांनी ७१ मते मिळवून ११ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ६० मते मिळाली. याच निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही विजय मिळवत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रथमच प्रवेश केला आहे.

विजयानंतर आपली भूमिका मांडताना संजीवराजे म्हणाले की, सातारा जिल्हा बँकेच्या दहा वर्षांच्या, दोन कार्यकाळांच्या मर्यादेच्या नियमामुळे यावेळी अनेक अनुभवी आणि बँकेचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळलेल्या ज्येष्ठ मंडळींना थांबावे लागले आहे. अशा संक्रमणाच्या काळात बँकिंग क्षेत्राची सखोल माहिती आणि प्रत्यक्ष कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींनी बँकेच्या कामकाजात योगदान देणे आवश्यक आहे. आपल्याला बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्याने या जबाबदारीतून बँकेसाठी चांगले काम करता येईल आणि संस्थेची गौरवशाली परंपरा पुढे नेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकारी संस्था अडचणीत आल्यास त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढून पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थितीत आणण्यासाठी व्यावसायिक आणि प्रशासकीय अनुभवाची आवश्यकता असते. अशा प्रकारच्या कामाचा आपल्याला अनुभव असून, त्याचा उपयोग जिल्हा बँकेचा एकूण कारभार अधिक सक्षम, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या राजकीय परंपरेविषयी बोलताना संजीवराजे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने आजवर सहकार क्षेत्रात स्वतंत्र आणि आदर्श परंपरा जपली आहे. बँकेच्या कामकाजात पक्षीय राजकारणाला स्थान न देता, बाह्य राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहून शिस्तबद्ध पद्धतीने कारभार करण्याची परंपरा या बँकेने निर्माण केली आहे. ही परंपरा कायम राखणे गरजेचे आहे. बँकेच्या विकासासाठी पक्षीय समीकरणांपेक्षा संस्थेच्या हिताचा विचार करणारी समविचारी मंडळी एकत्र येणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास बँकेची प्रगती अधिक वेगाने साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या विजयाची बातमी फलटण शहरात पोहोचताच समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.






