आपलं फलटण :सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे सर्व निकाल स्पष्ट झाले असून, २१ सदस्यांच्या संचालक मंडळात भाजपने ९ जागांसह सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ८, तर शिवसेनेने ४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात भाजपने पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले असले, तरी सत्तेच्या दृष्टीने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. विशेष म्हणजे, महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही निकालात स्वतंत्र पक्षीय ताकद अधोरेखित झाली आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी नऊ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी पाच, तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या. बिनविरोध निवड आणि प्रत्यक्ष मतदानातील विजय यांची बेरीज केल्यानंतर भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ८ आणि शिवसेनेचे ४ असे अंतिम संख्याबळ निश्चित झाले.
भाजपचे ९ संचालक; जिल्हा बँकेत सर्वाधिक संख्याबळ भाजपच्या वतीने सर्जेराव सावंत, मंत्री जयकुमार गोरे, ज्ञानदेव रांजणे, डॉ. अतुल भोसले, सोमनाथ धुमाळ, अर्जुन काळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, नंदकुमार मोरे आणि चंद्रकांत जाधव यांनी संचालकपद मिळवले आहे. यामध्ये पाच संचालक बिनविरोध निवडून आले, तर चार जागांवर निवडणुकीत विजय मिळवण्यात भाजपला यश आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ संचालक; ग्रामीण सहकारातील पकड कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्यजित वीर, मंत्री मकरंद पाटील, ऋतुजा पाटील-वाठारकर, उदयसिंह पाटील-उंडाळकर, रूपाली राजपुरे, अजय भोसले, योगेश फडतरे आणि सुनील माने हे आठ संचालक निवडून आले आहेत. यामध्ये तीन संचालक बिनविरोध, तर पाच संचालक निवडणुकीतून विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपपेक्षा केवळ एका जागेने मागे असलेल्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आपले राजकीय बळ कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
शिवसेनेचे ४ संचालक; फलटण आणि पाटणमध्ये महत्त्वाचे विजय शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, मंगल पाटील आणि माजी आमदार दीपक चव्हाण हे चार संचालक निवडून आले आहेत. यापैकी मंगल पाटील यांची महिला राखीव गटातून बिनविरोध निवड झाली, तर उर्वरित तीन जागांवर निवडणुकीत विजय मिळाला.
फलटणच्या लढतीने जिल्ह्याचे लक्ष वेधले
या निवडणुकीत फलटण सोसायटी मतदारसंघातील संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर ही लढत विशेष प्रतिष्ठेची ठरली. शिवसेनेचे संजीवराजे यांनी भाजपचे समशेरसिंह यांचा 70 विरुद्ध 60 अशा 10 मतांनी पराभव केला. या विजयामुळे फलटणमधील राजे गटाने जिल्हा बँकेच्या राजकारणात आपले अस्तित्व पूर्ववत राखले आहे तर पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी जिल्हा बँकेत प्रथमच दिमाखात प्रवेश केल्याने जिल्हा बँकेत फलटणकरांचे अस्तित्व ठळक झाले आहे
सत्तेचे गणित अद्याप महत्त्वाचे
२१ सदस्यांच्या संचालक मंडळात बहुमतासाठी ११ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपकडे नऊ संचालक असल्याने बहुमतासाठी आणखी दोन सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ १२ होते. त्यामुळे पक्षीय संख्याबळाबरोबरच संचालकांमधील राजकीय समन्वय, नेत्यांचे संबंध आणि सहकार क्षेत्रातील हितसंबंध यांना आगामी सत्तास्थापनेत महत्त्व राहणार आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली असली, तरी जिल्हा बँकेच्या निकालाने प्रत्येक पक्षाची स्वतंत्र ताकद स्पष्ट केली आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आघाडी घेतली, राष्ट्रवादीने जवळपास बरोबरी साधली, तर शिवसेनेने चार जागांच्या माध्यमातून महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासह अन्य पदांच्या निवडीवेळी कोणते राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने मोठा भाऊ म्हणून स्थान मिळवले असले, तरी सत्तेचा मार्ग अद्याप राजकीय जुळवाजुळवीतूनच जाणार आहे. निवडणुकीचा निकाल लागला असला, तरी जिल्हा बँकेतील सत्तेचा खरा अंक आता सुरू होणार आहे.






