फलटण:आपलं फलटण :
शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कर्तव्यनिष्ठा, नियोजन आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाची जोड आवश्यक असते. याच कार्यतत्परतेचा आदर्श घालून देत सासकल येथील कृषी सेवारत्न तथा सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्र अभियानात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सासकल आणि महाराष्ट्रातील पहिले ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी येथील तब्बल ७११ महिला शेतकऱ्यांचे अर्ज संकलित करून त्यांना अधिकृत शेतकरी ओळख मिळवून देण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज संकलन, ग्रामसभेची मान्यता आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व ओळखून सचिन जाधव यांनी सासकल येथे ४१२, तर धुमाळवाडी येथे २९९ असे एकूण ७११ महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे अर्ज संकलित केले. विशेष म्हणजे, या अर्जांना २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये मान्यता मिळवून देत पुढील प्रमाणपत्र वितरण प्रक्रियाही यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असते. पेरणीपासून काढणीपर्यंत आणि शेतीच्या व्यवस्थापनापासून उत्पादनाच्या प्रक्रियेपर्यंत महिला शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अनेकदा त्यांच्या या योगदानाला अधिकृत शेतकरी म्हणून आवश्यक ती ओळख मिळत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. या प्रमाणपत्रामुळे महिलांना शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अधिकृत ओळख आणि संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

केवळ अर्ज संकलनापुरते काम मर्यादित न ठेवता ग्रामसभेची मान्यता मिळविणे आणि प्रशासकीय प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सचिन जाधव यांनी घेतलेले परिश्रम त्यांच्या कामातील नियोजनबद्धता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारे आहेत. शासकीय यंत्रणेतील जबाबदारी पार पाडताना लोकाभिमुख कामातून सकारात्मक बदल घडविता येतो, याचे त्यांचे कार्य उत्तम उदाहरण ठरले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील (IAS), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी अजित सोनवलकर यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी बांधवांकडून सचिन जाधव यांचे अभिनंदन होत आहे.






