फलटण : आपलं फलटण :
शहराच्या विकासाबरोबरच त्याचा सांस्कृतिक वारसाही जपला गेला पाहिजे. सांस्कृतिक वारसा नसेल, तर शहराच्या वाढीला संस्कृतीची जोड मिळत नाही. सोसायटी कल्चरच्या वाढत्या प्रभावामुळे सार्वजनिक सांस्कृतिक जीवन लोप पावत असताना, फलटणचा हरवत चाललेला सांस्कृतिक वारसा जतन व समृद्ध करण्याचे काम माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू केले आहे, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित फलटण फेस्टिव्हल २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, दिलीपसिंह भोसले हे सहकार, उद्योग, शिक्षण, अर्थकारण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले मार्गदर्शक नेतृत्व आहे. भोसले कुटुंबीयांकडून फलटणकरांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जातो. शहरात नागरिकांना मनोरंजनासाठी हक्काचे सार्वजनिक ठिकाण उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करताना, मागील काळात सार्वजनिक जागांवरील आरक्षणे उठवून त्या ठिकाणी काँक्रीटची जंगले उभी राहिल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आता फलटण शहरासाठी नवीन सांस्कृतिक भवन मंजूर झाले असून, रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि मूलभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. शहराला कायमस्वरूपी सांस्कृतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यातून समृद्ध सांस्कृतिक वारसा उभा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार सचिन पाटील म्हणाले, दुष्काळाचे सावट असतानाही सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. फलटण फेस्टिव्हलमुळे व्यापारी वर्गाला तसेच महिलांच्या गृहउद्योगांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या व्यवसायाला आर्थिक चालना मिळण्यास मदत होईल.
माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी बंद पडलेला फलटण फेस्टिव्हल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी काळात या महोत्सवाला आणखी चांगले स्वरूप देण्याचा प्रयत्न राहील. फेस्टिव्हलचे नियोजन उत्तम झाले असून, यातील विविध कार्यक्रमांचा फलटणकरांनी मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप यांनी केले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले, अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, सद्गुरू हरिभाऊ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटण फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, खजिनदार संदीप जगताप, विक्रम आप्पा भोसले, बजरंग गावडे, हेमंत बोरावके आणि उदयसिंह निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
फलटणच्या सांस्कृतिक वैभवासाठी केंद्राचे उपकेंद्र हवे!
फलटणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, स्थानिक कला, लोकपरंपरा आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विभागीय उपकेंद्र फलटणमध्ये सुरू करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा फलटण फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली. फलटणचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याबरोबरच तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले. रवींद्र बेडकिहाळ यांनी आभार मानले.






