फलटण : आपलं फलटण श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित फलटण फेस्टिव्हल २०२६ अंतर्गत झालेल्या ग्रुप डान्स स्पर्धेत सातारा येथील आकाश कला केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. फलटणच्या नृत्यकला अकॅडमीने द्वितीय, तर अल्फा ग्रुप फलटणने तृतीय क्रमांक मिळवला. विविध नृत्यशैली, बहारदार सादरीकरण आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त नृत्याविष्कारामुळे ही स्पर्धा प्रेक्षणीय ठरली. फलटणकर रसिकांनीही या सांस्कृतिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, चंदूकाका सराफ अँड सन्सच्या फलटण शाखेचे व्यवस्थापक श्रीनिवास सूर्यवंशी, श्री सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, श्रीराम बाजारचे संचालक जयकुमार शिंदे, धनंजय पवार, महाराजा उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप, निखिल मोरे, प्रवीण पवार आणि अमित कांबळे उपस्थित होते.

स्पर्धेत विविध शाळा आणि नृत्य अकॅडमींच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सहकारमहर्षी हनुमंत पवार हायस्कूल, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, श्रीराम विद्या भवन प्राथमिक शाळा, निश्चितच डान्स अकॅडमी, औरागर ग्रुप, अल्फा गर्ल्स ग्रुप, श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर नगर परिषद शाळा क्रमांक आठ, फॅक्टरी डान्स अकॅडमी, आकाश कला केंद्र (सातारा), नृत्यकलाकार (फलटण) आणि गणेश ग्रुप यांसह विविध संस्थांच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. प्रत्येक सादरीकरणातून नृत्यकौशल्य, तालबद्धता आणि सांघिक समन्वयाचे दर्शन घडले. उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

पुणे येथील कल्चरल आर्टिस्ट व नृत्यदिग्दर्शक प्रा. गणेश उपाध्याय आणि बारामती येथील कलाकार व दिग्दर्शक सनी पवार यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील विजेत्यांसह सहभागी गुणवंत कलाकारांचा संस्था समूहाच्या प्रमुख मधुबाला भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले, नगरसेविका रूपाली असते, कल्चरल ग्रुपच्या संचालिका राजस भोईटे, अलका बेडकिहाळ, स्वाती फुले यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिला मान्यवर उपस्थित होत्या.

फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून स्थानिक व परिसरातील विद्यार्थ्यांना आपली कलागुणांची क्षमता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. नृत्यस्पर्धेतील उत्साहपूर्ण सहभाग आणि रसिकांच्या प्रतिसादामुळे महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष रंगत आली.






