फलटण: आपलं फलटण :
सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत, कलाविष्कारांचा उत्साह आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन श्री सद्गुरू प्रतिष्ठान, फलटण आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ या महोत्सवाला आज, शनिवार (दि. २४) प्रारंभ होत आहे. सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर, एस.टी. स्टँडसमोर उद्घाटन सोहळा होणार असून, दि. २८ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि श्री सद्गुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा.संचालक शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपनगराध्यक्षा प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पाच दिवस, पाच आकर्षणे!
शनिवार, २४ ऑक्टोबर : उद्घाटन सोहळा आणि ‘गाणी मनातली’ ऑर्केस्ट्रा.
रविवार, २५ ऑक्टोबर : नृत्यकलाविष्कारांची रंगतदार ग्रुप डान्स स्पर्धा.
सोमवार, २६ ऑक्टोबर : महिलांसाठी आकर्षण ठरणारा ‘होम मिनिस्टर पैठणी शो’.
मंगळवार, २७ ऑक्टोबर : लावणीच्या ठेक्यावर रंगणारा लावणी महोत्सव.
बुधवार, २८ ऑक्टोबर : महोत्सवाचा समारोप.
फलटणच्या सांस्कृतिक वातावरणात उत्साहाची भर घालणाऱ्या या महोत्सवात नागरिकांना विविध कलाप्रकारांचा आनंद घेता येणार आहे. शहरासह परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ आणि कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.






