फलटण: आपलं फलटण जाधववाडी (ता. फलटण) येथील श्री बिरदेव देवस्थानच्या यात्रेनिमित्त संभाव्य वाद टाळणे, सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने फलटणच्या उपविभागीय दंडाधिकारी प्रियांका आंबेकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देवस्थान परिसरात काही धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
फलटण शहर पोलीस ठाण्याकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून या कालावधीत श्री बिरदेवाची अश्विन कोजागिरी पौर्णिमेला यात्रा आयोजित करण्यात आली असून, या यात्रेसाठी धनगर, माळी, रामोशी तसेच अन्य समाजांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेदरम्यान देवस्थानच्या उघड्या माळावर भाविक येत असल्याने सुमारे ३,५०० ते ५,००० भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
यात्रेच्या अनुषंगाने यापूर्वी दोन गटांमध्ये वाद झाल्याच्या नोंदी असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य वादाचे रूपांतर अनुचित प्रकारात होऊ नये, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये आणि भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
आदेशानुसार, दि. २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत श्री बिरदेव देवस्थान, जाधववाडी परिसरात देवस्थानच्या उघड्या माळावर एकत्र येणे, वाद्य वाजविणे, तसेच प्रथेनुसार प्रापंचिक बाबींच्या संदर्भात बळी देण्यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्सव काळात तसेच दैनंदिन धार्मिक विधींच्या अनुषंगानेही हे निर्बंध लागू राहतील.
सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि संभाव्य अनुचित घटना रोखण्याच्या उद्देशाने हा आदेश जारी करण्यात आला आहे. संबंधित देवस्थान ट्रस्ट, पोलीस प्रशासन आणि महसूल यंत्रणेला आदेशाची माहिती देण्यात आली आहे.






