आपलं फलटण 🙁 निंबळक प्रतिनिधी ) राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या झळा शेतकरी बांधवांना बसू नयेत, शेतीला मुबलक पाणी मिळावे आणि लवकरच समाधानकारक पाऊस बरसून बळीराजाच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी, अशी प्रार्थना माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी निंबळक येथील श्री निमजाईदेवीच्या चरणी केली. श्री निमजाईदेवी नवरात्रोत्सव २०२६ च्या निमित्ताने रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राम निंबाळकर आणि शंभूसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
निंबळक येथे श्री निमजाईदेवी मंदिराची भव्य वास्तू साकारून धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या राम निंबाळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गौरव केला. मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी राम निंबाळकर यांनी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे निंबळकला धार्मिक स्थळाची ओळख प्राप्त झाली असून, परिसराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या कार्याबद्दल रामसाहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, असे गौरवोद्गार माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काढले.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याची समृद्धी हीच गावाच्या विकासाची खरी ताकद आहे. पावसाअभावी शेती आणि शेतकऱ्यांवर संकट ओढवू नये, अशी भावना व्यक्त करत त्यांनी बळीराजाच्या सुखसमृद्धीसाठी देवीकडे साकडे घातले. जनकल्याण, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती आणि साखर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण समृद्धी साधण्याच्या दृष्टीनेही शेतकरीहिताला प्राधान्य देण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली.
श्री निमजाईदेवी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे निंबळक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.






