आपलं फलटण: फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी आपल्या भेदक गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या तिन्ही गटांत विजेतेपद पटकावत मुधोजीच्या संघांनी तालुक्यातील क्रिकेटवरील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला.
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडी यांच्या आयोजनातून अभियांत्रिकी महाविद्यालय, ठाकूरकी येथे बुधवारी (दि. ३०) ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई व एसएससी), व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, फरंदवाडी तसेच मालोजीराजे शेती विद्यालय आदी संघांनी सहभाग घेतला.
१४ वर्षांखालील गटात १० धावांनी विजय
१४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडीचा १० धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुधोजीने पाच षटकांत तीन गडी गमावून ४४ धावा केल्या. सिद्धेश घनवटने १२, हर्षदीप चौहान व रागवीर पवार यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या.
४५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या जाधववाडी संघाला मुधोजीच्या अचूक गोलंदाजीसमोर पाच षटकांत ३४ धावाच करता आल्या. हर्षदीप चौहानने दोन, वैष्णव भोसलेने एक बळी घेतला, तर सिद्धेश घनवटने एक गडी धावचित केला.
१७ वर्षांखालील गटात आठ धावांनी बाजी
१७ वर्षांखालील अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजसमोर व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचे आव्हान होते. नाणेफेक जिंकून व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुधोजीने पाच षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ४६ धावा उभारल्या. इंद्रजीत गुंजवटेने १२, सुजय बोडकेने ११, तर हासिम राजा शहा व मयुरेश कुंभार यांनी प्रत्येकी सहा धावा केल्या.
४७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलला ३९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे मुधोजीने हा सामना आठ धावांनी जिंकत १७ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले.
१९ वर्षांखालील गटात तब्बल ६२ धावांनी विजय
१९ वर्षांखालील गटात मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने फलटणच्या मालोजीराजे शेती विद्यालयाचा तब्बल ६२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुधोजीने पाच षटकांत बिनबाद १०७ धावांचा डोंगर उभा केला. श्रवण खाडेने नाबाद ४२, तर विनायक दळवीने नाबाद २७ धावांची आक्रमक खेळी केली.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मालोजीराजे शेती विद्यालयाला तीन गड्यांच्या मोबदल्यात ४५ धावाच करता आल्या. मुधोजीने ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्या गटातीलही विजेतेपद आपल्या नावावर केले.
तिन्ही गटांत विजेतेपदाची हॅट्ट्रिक
एकाच स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांत विजेतेपद मिळविण्याची कामगिरी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रिकेट संघांनी केली. त्यामुळे आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही मुधोजीच्या संघांकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
स्पर्धेप्रसंगी फलटण तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष तायप्पा शेंडगे, उत्तमराव घोरपडे, अमोल नाळे, सुजीत जमदाडे, शिवलिंग सावंत, संजय गोफणे, सूरज ढेंबरे, अमित काळे, महेश निंबाळकर, अमर कोकरे व सोमनाथ चौधरी उपस्थित होते. सामन्यांचे पंच म्हणून ज्येष्ठ क्रिकेट पंच संजय गायकवाड, रवींद्र दळवी, अमोल नाळे व रोहन निकम यांनी काम पाहिले.
मुधोजीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय लोंढे-पाटील, सौ. पूजा पाटील, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






