फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी फलटण नगरपरिषदेतर्फे विशेष ‘संडे SHGs मार्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नगरपरिषद प्रांगणात तीन दिवसीय बाजार भरविण्यात येणार असून, यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले विविध दर्जेदार खाद्यपदार्थ व घरगुती उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
फलटण नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ जनआजीविका योजना व आत्मनिर्भर शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेंद्रिय, स्वच्छ, हायजिनिक आणि घरगुती चवीचे विविध खाद्यपदार्थ तसेच महिला बचत गटांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी फलटणकरांना हा बाजार उपयुक्त ठरणार आहे.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या उद्योगशीलतेला आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विशेष तीन दिवसीय बाजारानंतर ‘संडे SHGs मार्ट’ दर रविवारी फलटण नगरपरिषद प्रांगणात नियमितपणे भरविण्यात येणार आहे.
फलटणकरांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबासह या बाजाराला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.






