फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या ‘डीजे मुक्त मिरवणूक’ आणि ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांना ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ३३ गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा, तर १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डीजेमुळे होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासोबतच गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
डीजे मुक्त मिरवणुकीचा निर्णय घेतलेली ३३ गावे : मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरे शिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, तातवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंबोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुरणे, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर, टाकळवाडा आणि दालवडी.
‘एक गाव, एक गणपती’चा निर्णय घेतलेली १५ गावे : शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजाळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, माझेरी आणि उपळवे.
या उपक्रमामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासोबतच गावागावांत सामाजिक एकोपा वाढण्यास, पारंपरिक संस्कृतीचे जतन होण्यास आणि गणेशोत्सव शांततामय वातावरणात साजरा करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततामय, सुरक्षित आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी केले आहे.
‘एक गाव – एक विचार – एक उत्सव; डीजे मुक्त गणेशोत्सवातून सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करूया!’, असा संदेश फलटण ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.






