फलटण: आपलं फलटण :
तालुक्यात उसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढत असताना सहकारी तत्त्वावर चालणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडावा, अशी काही शेजारील कारखान्यांची भूमिका असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. श्रीराम कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी कारखाना असून तो सहकारातच टिकला पाहिजे. कारखाना सुरू करण्यासाठी शासनावर दबाव आणून तो सुरू करण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
क्षफलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर,तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष विक्रम पवार, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, सरचिटणीस डॉक्टर रवींद्र घाडगे उपस्थित होते. राजू शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘सरकारचे धोरण सहकार टिकविण्याचे आहे की सहकारी कारखाने बंद पाडून खासगी कारखान्यांना जगविण्याचे आणि वाढविण्याचे आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. मुख्यमंत्रीच श्रीराम कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ऐकिवात आहे. हे खरे असेल तर त्यामागील सरकारची भूमिका जनतेसमोर आली पाहिजे.’’
तालुक्यात ऊस वाढत असताना कारखान्यांची गाळप क्षमताही वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी कारखाना बंद ठेवणे हा शेतकरी हिताचा निर्णय होऊ शकत नाही. श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
साखरेच्या वाढलेल्या दरावरही शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरले. ‘‘बाजारात साखरेची कोणतीही टंचाई नाही. सध्या सुमारे दीड महिना पुरेल एवढा साखरेचा साठा असताना दर वाढण्याचे कारण काय?’’ असा सवाल त्यांनी केला. येत्या पंधरा दिवसांत दक्षिणेकडील साखर कारखाने सुरू होणार असल्याने साखरेचा पुरवठा आणखी वाढणार आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
गतवर्षी शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ३३७ लाख टन साखर उपलब्ध होती. त्यातील सुमारे २८० लाख टन साखरेचा वापर व निर्यात झाल्यानंतर उर्वरित साखरेपैकी मोठा साठा कुठे गेला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांनी साखरेची साठेबाजी केली आहे का? याची चौकशी करावी. अतिरिक्त साखर जप्त करण्याची मागणी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारने निर्यातबंदी केली असली तरी मुक्त व्यापाराच्या माध्यमातून बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आदी देशांमध्ये साखर गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेकडो ट्रकमधून साखर बाहेर गेली कशी? याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
‘ग्राहकांच्या खिशातून २२ ते २३ हजार कोटींचा घोटाळा’?
साखरेच्या वाढलेल्या दरामागे सरकारचा आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. पूर्वी सुमारे ३५ ते ३६ रुपये किलो असलेल्या साखरेच्या दराच्या तुलनेत सध्याच्या दरातील तफावत पाहता ग्राहकांच्या खिशातून तब्बल २२ ते २३ हजार कोटी रुपये अतिरिक्त काढून घेतले गेल्याचा आरोप त्यांनी केला.
साखरेच्या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. अनेक कारखान्यांकडे सरासरी २० टक्के साखर साठा शिल्लक आहे. गतवर्षी साखर विक्रीचा दर ३५-३६ रुपये गृहीत धरून शेतकऱ्यांना दर देण्यात आला होता. मात्र सध्या साखर ५८०० रुपये किंवा त्याहून अधिक दराने विकली गेली असेल तर उपलब्ध साठ्याच्या प्रमाणात शेतकऱ्यांना किमान ३०० ते ५०० रुपये अतिरिक्त दर देणे कारखान्यांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या सहकारी संस्थांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताची लढाई रस्त्यावर उतरून लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार असल्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला.
माढ्यातून शेट्टींना निवडणुकीचे निमंत्रण!
फलटण : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची भेट घेण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी एकत्र आले. यावेळी शेतकऱ्यांनी “आपण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी; आपल्या विजयासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,” अशी आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय चर्चेला नवा रंग आला आहे.





