फलटण : आपलं फलटण :ओबीसी समाजाच्या आरक्षणासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ सप्टेंबर रोजी मुंबईत लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाच्या अस्तित्वाच्या आणि हक्काच्या लढ्याची पुढील दिशा ठरविणारा ठरेल. त्यामुळे राज्यातील प्रत्येक ओबीसी बांधवाने आपापल्या गावातून मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आर्त आवाहन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.
एक सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी संपर्क अभियान अंतर्गत फलटण येथे ओबीसी समाज बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते
प्राध्यापक हाके पुढे म्हणाले ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर वर्षानुवर्षे चर्चा होत आली; आंदोलने झाली; शासनाकडे निवेदने देण्यात आली. मात्र, अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आरक्षणाचा प्रश्न असो, सामाजिक न्यायाचा प्रश्न असो अथवा ओबीसी समाजाच्या शैक्षणिक व राजकीय हक्कांचा विषय असो, या प्रश्नांकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. हक्क मागून मिळत नसतील, तर लोकशाहीच्या मार्गाने संघटित ताकदीने आपला आवाज शासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, अशी भूमिका प्रा. हाके यांनी मांडली.
‘घरात बसून हक्क मिळणार नाहीत’
ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असूनही समाजाच्या अनेक प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील चर्चेपुरता हा लढा मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्याची गरज आहे. आज आपण आपल्या हक्कांसाठी उभे राहिलो नाही, तर उद्या आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे, असे प्रा. हाके यांनी सांगितले.
१ सप्टेंबरच्या मोर्चासाठी राज्यभर जनजागृती सुरू असून गावागावांत बैठका, संपर्क अभियान आणि समाजबांधवांशी संवाद साधून आंदोलनाची माहिती पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातून ओबीसी बांधवांनी संघटितपणे मुंबईकडे निघावे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय चौकटीपेक्षा समाजाच्या हक्कांना प्राधान्य देऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही प्रा. हाके यांनी स्पष्ट केले.
हा मोर्चा केवळ गर्दी दाखविण्यासाठी नसून ओबीसी समाजाच्या मागण्यांची ताकद शासनाला दाखविण्यासाठी आहे. लाखोंचा जनसमुदाय मुंबईत एकवटला, तर ओबीसी समाजाचा आवाज दुर्लक्षित करणे शासनाला शक्य होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ओबीसींच्या एकजुटीची परीक्षा
ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर यापूर्वी अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, आता १ सप्टेंबरचा मोर्चा हा समाजाच्या एकजुटीची मोठी परीक्षा ठरणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने मतभेद बाजूला ठेवून आपल्या हक्कांच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात किंवा कोणत्याही समाजाविरोधात नसून ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आहे, असे प्रा. हाके यांनी स्पष्ट केले.
ओबीसी बांधवांनी आपल्या कुटुंबीयांसह, नातेवाईकांसह आणि समाजबांधवांसह या आंदोलनात सहभागी व्हावे. गावातील प्रत्येक ओबीसी कुटुंबापर्यंत मोर्चाचा संदेश पोहोचवून ‘आपण मुंबईला जाणारच’ असा निर्धार करण्याची वेळ आली आहे.
१ सप्टेंबरला मुंबईत केवळ गर्दी नको, तर ओबीसी समाजाच्या हक्कांचा बुलंद आवाज ऐकू यायला हवा. आपल्या हक्कासाठी, आपल्या आरक्षणासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत धडक द्या, असे कळकळीचे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.





