फलटण : आपलं फलटण :फलटण नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची जागतिक पातळीवर दखल घेत शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्यांची ‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ (Youngest Municipal Corporator – Female) म्हणून अधिकृत नोंद केली असून, या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या प्रमाणपत्रानुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सिद्धाली शहा यांनी हा विक्रम आपल्या नावे केला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षे १० महिने ५ दिवस इतके होते. एवढ्या कमी वयात नगरसेविका म्हणून सार्वजनिक जीवनाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी केलेल्या कार्याची आता जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे.
सिद्धाली शहा या आपल्या प्रभागातील तसेच फलटण शहरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने सक्रिय असतात. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
या विक्रमामुळे फलटण शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले असून, सिद्धाली शहा यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांना या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुभेच्छा देण्यात येत आहेत.
‘नेत्यांचा विश्वास आणि मतदारांचे आशीर्वाद महत्त्वाचे’
या जागतिक विक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कु. सिद्धाली शहा म्हणाल्या, “ही कामगिरी माझ्यावर विश्वास ठेवणारे आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे शक्य झाली. भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढविण्याची संधी त्यांनी मला दिली. त्याचबरोबर फलटणच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. या सर्वांच्या विश्वासामुळेच आजची ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली आहे.”
सिद्धाली शहा यांच्या या विक्रमामुळे तरुण नेतृत्वाला सार्वजनिक जीवनात संधी मिळाल्यास ते प्रभावीपणे काम करू शकते, असा संदेशही फलटणच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.





