फलटण : आपलं फलटण :
श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) ऊर्फ काका यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय तसेच सौ. वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), सदस्य प्रकाश तारळकर तसेच माजी प्राचार्य आप्पा शिंदे यांच्या हस्ते कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. यादव एस. डी. यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत व यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त गुरुजनांचा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेने आपल्या कार्याची घेतलेली दखल ही अविस्मरणीय असल्याची भावना सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली.

गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी, बारावी बोर्ड परीक्षा, बी.ए. भाग तीन, बी.कॉम. भाग तीन, डी. फार्मसी तसेच माध्यमिक स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

दि. १८ ते २१ ऑगस्टदरम्यान कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) ऊर्फ काका यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमध्ये वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
‘AI प्रशिक्षण काळाची गरज’
मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी मनोगतात कै. काकांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा देत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगत माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षणाचे महत्त्व वाढले आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा आणि कौशल्याचा गौरव करण्याची संधी संस्थेला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, सेवानिवृत्त शिक्षक, विद्यार्थी, खेळाडू, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम., उपप्राचार्य घनवट पी. डी. व सर्व विभागप्रमुखांनी केले. कला शिक्षिका सौ. ढेंबरे डी. पी. यांनी फलक लेखन केले. सूत्रसंचालन प्रा. यादव एस. डी., सौ. तगारे एस. एम. व क्रीडा शिक्षक प्रा. माने डी. आर. यांनी केले, तर आभार सौ. पवार एस. आर. यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





