फलटण : आपलं फलटण : मौजे कोळकी (ता. फलटण) येथील गट क्रमांक ७९/१/१, ७९/१/५ व ८०/१ या जमिनींच्या भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून पाच जण फरार आहेत
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रणधीर धनसिंगराव भोंईटे, विक्रम महादेवराव झांजुर्णे व राजेंद्र सदाशिव कापसे यांचा समावेश आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता २४ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निवासी नायब तहसीलदार अभिजित अशोक सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या आदेशानंतर सोनवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, रणधीर धनसिंगराव भोंईटे यांनी ११ जून २०२५ रोजी संबंधित जमिनीबाबत तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यासोबत १९ जून २०२५ रोजीचा मूल्यांकन दाखला सादर करण्यात आला. या दाखल्याच्या आधारे जमिनीचे मूल्यांकन ३५ लाख १ हजार रुपये निश्चित करून त्याच्या ५० टक्के रकमेप्रमाणे १७ लाख ५१ हजार रुपये नजराणा शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. त्यानंतर संबंधित गटांबाबत कुळकायदा आदेशही पारित करण्यात आला.
दरम्यान, तक्रारदारांनी दाखला बनावट असल्याचा आरोप केल्यानंतर चौकशी करण्यात आली. नव्याने केलेल्या मूल्यांकनानुसार गट क्रमांक ७९/१/१ व ७९/१/५ चे मूल्यांकन ४३ लाख ३३ हजार रुपये, तर गट क्रमांक ८०/१ चे ३३ लाख २६ हजार रुपये, असे एकूण ७६ लाख ५९ हजार रुपये निश्चित झाले. त्यानुसार नजराणा रकमेतील फरकाची रक्कमही शासनाकडे जमा करण्यात आली.
या प्रकरणी रणधीर धनसिंगराव भोंईटे यांच्यासह निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजित तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि विरेंद्र विक्रम झांजुर्णे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील देवकर, प्रविण नाईक निंबाळकर, रामचंद्र नाईक निंबाळकर, अभिजित इंगळे व विरेंद्र झांजुर्णे हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.





