फलटण आपला फलटण प्रतिनिधी
शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व डॉ. संजय पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी संजीवराजे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिक्षणासह सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात डॉ. पाटील यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या निधनाने दूरदृष्टीचे व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, हेमंत रानडे, प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





