फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे वाहन चालक तथा पादचार्य नागरिकांनाही खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सातारा। फलटण फलटण शहरातील प्रमुख सर्वच रस्ते यांची दुरावस्था व रस्ते यांची तातडीने दुरुस्तीसाठी फलटण शहर व तालुका काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने फलटण नगर परिषद,फलटणचे मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांना निवेदन देण्यात आले ,यावेळी फलटण नगर परिषद नगरसेवक पंकज पवार, फलटण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अल्ताफ पठाण, मनोहर गायकवाड, लक्ष्मण शिंदे, मंजेखान मेटकरी, गंगाराम रणदिवे व पदाधिकारी उपस्थित होते

याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शहरातील भगवान महावीर स्तंभ ते आचार्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक, महात्मा गांधी चौक ते तेली गल्ली, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते नेहरू पुतळा (बारस्कर गल्ली), शंकर मार्केट ते शुक्रवार तालीम गणपती मंदिर, निर्मलादेवी प्राथमिक विद्यालय ते उपळेकर महाराज मंदिर, अँड. नरेंद्र कृष्णचंद्र भोसले घर ते अँड. एन. एम. यादव घर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पंचवटी चौक तसेच उमाजी नाईक चौक ते यशवंतनगर या प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन-विसर्जन तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन याच प्रमुख मार्गांवरून होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यांची सध्याची दुरवस्था पाहता वाहतूक कोंडीसोबतच अपघातांची शक्यता वाढण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, फलटण शहरातील पालखी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असले तरी काही ठिकाणी पाईपलाईनच्या लिकेजमुळे काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारास योग्य सूचना देऊन लिकेजचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे आणि प्रमुख मार्ग युद्धपातळीवर वाहतुकीस योग्य करावेत, अशी मागणी महेंद्र सूर्यवंशी यांनी केली आहे.





