फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोळकी जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी तब्बल ८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याची माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात कोळकी जिल्हा परिषद गटातील जनतेला विकासकामांबाबत दिलेला शब्द माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाळला असून, रस्ते विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मंजूर निधीत भाडळी खुर्द ते पाटील वस्ती रस्ता सुधारणा – २२ लाख ५० हजार रुपये, दहिवडी रस्ता ते सासकल रस्ता – ३७ लाख ५० हजार रुपये, सासकल ते झिरपवाडी रस्ता – २२ लाख ५० हजार रुपये, विमानतळ-ठाकुरकी रस्ता ते पद्मावती मंदिर, ठाकुरकी तावडी रस्ता – ३७ लाख ५० हजार रुपये, गिरवी ते दुधेबावी रस्ता – १ कोटी १३ लाख रुपये, विमानतळ ते ठाकुरकी रस्ता – १ कोटी १२ लाख रुपये, तसेच कुरवली खुर्द-विचुरणी भागातील कुरवली ते निरगुडी रस्ता सुधारणा – ४ कोटी ७० लाख रुपये या कामांचा समावेश आहे.
या निधीमुळे कोळकी जिल्हा परिषद गटातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा होऊन नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांसाठीही निधी मंजूर करण्यात आल्याने ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.
या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे कोळकी जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीने जयकुमार शिंदे यांनी आभार मानले.

“भविष्यातही मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासकामांना प्राधान्य देत आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असा विश्वास जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.





