आपलं फलटण | प्रतिनिधी
फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच गुणवरे (ता. फलटण) येथील कणसे वस्तीवर दूध काढण्याच्या इलेक्ट्रिक मशीनचा शॉक लागून २८ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. २४) सायंकाळी घडली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका तानाजी कर्णे (वय २८, रा. गुणवरे, ता. फलटण) या नेहमीप्रमाणे पती तानाजी ज्ञानबा कर्णे यांच्यासमवेत गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या. दूध काढून झाल्यानंतर मशीनला जोडलेल्या कॅनचे झाकण काढून ते गोठ्यातील विद्युत बोर्डाजवळ ठेवत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला.
प्रियंका यांनी आरडाओरडा करताच पती तानाजी कर्णे यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना विजेच्या संपर्कातून दूर केले. त्या वेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे गुणवरे परिसरात शोककळा पसरली असून शुक्रवारी (दि. २५) सकाळी नऊ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गोठ्यातील तसेच शेतातील विद्युत उपकरणे, वायरिंग आणि वीजजोडणीची नियमित तपासणी करून सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
चौकट : पंधरा दिवसांत सहा बळी; विद्युत सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
८ जुलै २०२६ रोजी विजेचा शॉक लागून खामगाव येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा, तर राजुरी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनांची धग अद्याप कायम असतानाच गुणवरे येथे आणखी एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत फलटण तालुक्यात विजेच्या शॉकमुळे सहा जणांचा बळी गेला आहे.
या सलग घटनांमुळे वीज वितरण व्यवस्थेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हे अपघात मानवी निष्काळजीपणामुळे झाले की विद्युत सुरक्षेतील त्रुटींमुळे, याचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. महावितरणने विद्युत सुरक्षेसंदर्भात अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यासह ग्राहकांचे सातत्याने प्रबोधन करावे, अशी मागणी जाणकार नागरिकांकडून होत आहे.
चौकट : नऊ महिन्यांचे बाळ झाले आईच्या मायेपासून कायमचे पोरके
प्रियंका कर्णे यांच्या आकस्मिक निधनाने कर्णे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात अवघे नऊ महिन्यांचे चिमुकले बाळ असून ते आईच्या मायेपासून कायमचे पोरके झाले आहे. या निष्पाप बालकाच्या भवितव्याची चिंता व्यक्त करताना अंत्यसंस्कारावेळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गुणवरे परिसर हळहळ व्यक्त करत आहे.





