आपलं फलटण | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा भक्तीबरोबरच समाजसेवा आणि माणुसकीची परंपरा जपणारा सोहळा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘जॉय ऑफ गिव्हिंग, शेअरिंग अँड केअरिंग’ या उपक्रमाचे शंभरावे सत्र विनर्स गुरुकुल, नाईकबोमवाडी तसेच वाजेगाव येथे उत्साहात पार पडले. यावेळी वैराटवासी स्वामी आबानंदगिरी दिंडी (क्र. १६३) मधील वारकऱ्यांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले.
गुरुवर्य शशिकांत खामकर व ज्योती खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टने वारकऱ्यांना छत्र्या, रेनकोट, फर्स्ट एड बॉक्स, ओआरएस टेट्रा पॅक, पिण्याचे पाणी तसेच फराळाचे वाटप केले. पावसाळ्यातील वारीचा प्रवास अधिक सुसह्य व्हावा, या उद्देशाने आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय संपूर्ण दिंडीसाठी अन्नदानाचा उपक्रमही राबविण्यात आला.
या सेवाकार्यात मुंबई, ठाणे, भिवंडी, पुणे, कोल्हापूर, कोकण आदी भागांतील विनर्स परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवाभावाचा आदर्श घालून दिला. वारी ही केवळ अध्यात्माची वाट नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि परस्पर सहकार्याची भावना जपणारी संस्कृती असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याचे वारकरी व ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत कौतुक केले. उपक्रमाचे नियोजन विनर्स ट्रस्टचे विश्वस्त गजेंद्र जुईकर, विनर्स गुरुकुलचे शिक्षकवृंद तसेच जॉय ऑफ गिव्हिंग टीमने केले.

वाजेगाव (ता. फलटण) : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वैराटवासी स्वामी आबानंदगिरी दिंडी (क्र. १६३) मधील दिंडीचालकांचे स्वागत करताना गुरुवर्य शशिकांत खामकर, ट्रस्टचे पदाधिकारी व अन्य मान्यवर.





