आपलं फलटण प्रतिनिधी:
जिद्द, चिकाटी आणि कलेवरील नितांत प्रेम असेल तर ग्रामीण भागातील एक छोटासा कारखानाही राष्ट्रीय स्तरावरील कलादालन बनू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे फलटण तालुक्यातील टाकळवाडे गावचे युवा शिल्पकार संतोष मिंड. कोणतीही मोठी शासकीय संस्था किंवा आधुनिक सुविधा नसताना केवळ स्वतःच्या कष्टाच्या आणि कलागुणांच्या बळावर त्यांनी शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज महाराष्ट्रातील विविध भागांतून महापुरुषांचे पुतळे तयार करण्यासाठी त्यांच्याकडे मागणी होत असून त्यांच्या हातून साकारलेली प्रत्येक कलाकृती त्यांच्या कौशल्याची साक्ष देत आहे.

याच कलावैभवाचा आणखी एक मानाचा तुरा म्हणजे हरितक्रांतीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा तब्बल ११ फूट उंचीचा भव्य पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा. गंगाखेड येथील स्मारक समितीने संतोष मिंड यांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्याकडे सोपविला. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमातून त्यांनी हा पुतळा अत्यंत देखणा, प्रमाणबद्ध, आकर्षक आणि वास्तवदर्शी स्वरूपात साकारला.

पुतळा पूर्ण झाल्यानंतर स्मारक समितीचे अध्यक्ष अंबादास राठोड, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. सर्व शासकीय नियम व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा भव्य पुतळा गंगाखेडकडे रवाना करण्यात आला. यावेळी “जय सेवालाल”… “वसंतराव नाईक अमर रहे”… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गंगाखेड येथे पुतळ्याची प्रतिष्ठापना झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिल्पाचे बारकाईने निरीक्षण करत संतोष मिंड यांच्या कलेचे मनापासून कौतुक केले. चेहऱ्यावरील भाव, व्यक्तिमत्त्वातील रुबाब, पोशाखातील सूक्ष्मता आणि शिल्पातील जिवंतपणा पाहून अनेकांनी हा पुतळा राज्यातील उत्कृष्ट शिल्पांपैकी एक असल्याची भावना व्यक्त केली.
टाकळवाडे या ग्रामीण भागात स्वतःची अत्याधुनिक शिल्पनिर्मिती कार्यशाळा उभारून संतोष मिंड यांनी अनेक युवकांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. वॅक्स मॉडेलिंग, ब्राँझ कास्टिंग, पंचधातू शिल्पनिर्मिती आणि वास्तवदर्शी पूर्णाकृती पुतळे तयार करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित शिल्पकारांशी त्यांचा सातत्याने संपर्क असून विविध प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे.

महापुरुष, संत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळे तयार करण्यात त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये केवळ धातू नसतो, तर त्या व्यक्तिमत्त्वाचा इतिहास, विचार आणि प्रेरणा जिवंत झाल्याचा अनुभव पाहणाऱ्याला येतो. त्यामुळेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून त्यांच्याकडे सातत्याने मागणी वाढत आहे.
ग्रामीण मातीतून घडलेला हा कलाकार आज आपल्या हातातील छिन्नी आणि हातोड्याच्या बळावर महाराष्ट्राच्या शिल्पकलेला नवी दिशा देत आहे. मेहनत, प्रामाणिकपणा, दर्जा आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम असलेली त्यांची प्रत्येक कलाकृती भविष्यातही अनेक स्मारकांमधून इतिहासाची साक्ष देत राहणार, यात शंका नाही.

◼ संपर्कासाठी आवाहन
महापुरुष, संत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे ब्राँझ, पंचधातू, फायबर, पूर्णाकृती, अर्धाकृती व स्मारक शिल्पे अत्यंत दर्जेदार, वास्तवदर्शी आणि शासकीय निकषांनुसार तयार करून मिळतील.
ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका, स्मारक समित्या, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक मंडळे तसेच सामाजिक संघटनांनी शिल्पनिर्मितीसाठी टाकळवाडे (ता. फलटण, जि. सातारा) येथील युवा शिल्पकार संतोष मिंड यांच्याशी 9922987190 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट १५ वर्षांची प्रतीक्षा संपवणारा टाकळवाड्याचा कलाकार!
गंगाखेड येथे हरितक्रांतीचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लोटला. या काळात पुतळा तयार करण्याची जबाबदारी दोन-तीन ठिकाणी देण्यात आली होती; मात्र विविध कारणांमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे स्व. वसंतराव नाईक यांचे हितचिंतक, बंजारा समाजाचे कार्यकर्ते आणि गंगाखेडकरांची प्रतीक्षा कायम होती.

अखेर गंगाखेडच्या स्मारक समितीने टाकळवाडे (ता. फलटण) येथील युवा शिल्पकार संतोष मिंड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे आव्हान स्वीकारत केवळ एका वर्षाच्या आत स्व. वसंतराव नाईक यांचा ११ फूट उंचीचा भव्य पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा साकार करून दिला आणि तब्बल १५ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली.
पुतळ्याचे अनावरण होण्यापूर्वीच त्याच्या वास्तवदर्शी कलाकुसरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्मारक समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी संतोष मिंड यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले. गंगाखेडमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या उत्कृष्ट शिल्पकलेची विशेष दखल घेत भरभरून प्रशंसा केली. ग्रामीण भागातील कलाकाराने वेळेत आणि उच्च दर्जाचे काम पूर्ण करून राज्यभर आपल्या कलेची वेगळी ओळख निर्माण केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







