फलटणच्या अध्यात्मिक वारशाला मानवंदना; डेक्कन चौक–उमाजीराजे नाईक चौक मार्गाला ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ नामकरण
आपलं फलटण प्रतिनिधी: फलटणच्या समृद्ध अध्यात्मिक परंपरेचा सन्मान करत संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने फलटण नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक या मार्गाला ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या नामकरणासाठी विजय उपळेकर यांनी नगर परिषदेकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या ठरावाचे सूचक नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले तर अनुमोदक नगरसेवक अमित भोईटे होते.
संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांनी वैद्यकीय सेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधत समाजात जनजागृती, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा रुजविण्याचे कार्य केले. त्यांच्या स्मृती जतन व्हाव्यात आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या भावनेतून नगर परिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, फलटणला संतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. संत उपळेकर महाराजांचे अध्यात्मिक आणि सामाजिक योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांसह नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होण्यास मदत होईल.
या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, शहराच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या नामकरणामुळे संतांच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक स्वरूपात जपला जाईल, अशी भावना व्यक्त केली.






