पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत ३५ तोळे सोने लंपास
चोऱ्यांच्या मालिकेने नागरिक भयभीत; ‘चोरटे शिरजोर, पोलीस हतबल’ अशी चर्चा
आपलं फलटण( प्रतिनिधी )
फलटण तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांत घरफोड्यांच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून चोरट्यांनी तीन ठिकाणी डल्ला मारत तब्बल ३५ तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “चोरटे शिरजोर आणि पोलीस हतबल” अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
गुणवरे येथे झालेल्या घरफोडीत सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले. मठाचीवाडी येथे तीन तोळे सोने लंपास करण्यात आले. तर गोखळी येथे चोरट्यांनी मोठा हात मारत सुमारे २० तोळे सोने आणि रोख रक्कम पळवून नेली. सलग घडलेल्या या घटनांमुळे पूर्व भागातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक चोरीनंतर पोलिसांकडे तक्रारी दाखल होतात, पंचनामे होतात, गुन्हे नोंदवले जातात; मात्र त्यानंतर तपासाची गती कुठेच दिसून येत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. चोरीच्या घटनांमधील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
एकीकडे ग्रामीण भागातील नागरिक कष्टाने कमावलेली आयुष्यभराची बचत घरात जपून ठेवत असताना, दुसरीकडे चोरटे सहजपणे घरफोड्या करून पसार होत असल्याने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याच्या तक्रारीही काही गावांमधून पुढे येत आहेत.
सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी केवळ नागरिकांचीच नव्हे तर पोलिसांचीही झोप उडवली आहे. या टोळीने पोलिसांसमोर थेट आव्हान उभे केल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनांचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौकट : नागरिकांचा संतप्त सवाल
“चोरी होते, गुन्हे दाखल होतात; पण चोरटे सापडणार कधी?”
पूर्व भागातील सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर तपासाचा वेग वाढवून चोरट्यांना जेरबंद करणे आवश्यक असताना अद्याप ठोस यश मिळालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने प्रभावी कारवाई करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी आणि कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ
आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…





