आपलं फलटण: प्रतिनिधी
बहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. गेली सहा दशके गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना संस्थेचे माजी विद्यार्थी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे (दादा) यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत संस्थेच्या कार्याचा गौरव केला. “सन १९५९ मध्ये इयत्ता आठवीत प्रवेश घेतल्यानंतर या संस्थेने आम्हाला केवळ शिक्षणच नव्हे तर शिस्त, संस्कार आणि जीवनमूल्यांचे धडे दिले. विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे कार्य येथील गुरुजनांनी केले. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी स्थापन झालेली ही संस्था आजही त्याच तळमळीने कार्यरत आहे, ही अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
खलाटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना, “१९५९ मधील साधा शालेय परिसर आणि आजचे आधुनिक शैक्षणिक संकुल पाहताना मन समाधानाने भरून येते. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत स्वर्गीय सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी बेडके यांचे मोठे योगदान आहे. तसेच डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके आणि महेंद्र सूर्यवंशी बेडके यांच्या नेतृत्वाखाली संस्था नवनवीन उंची गाठत आहे. भविष्यातही संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो,” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी बेडके, माजी विद्यार्थी आप्पासाहेब ज्ञानोबा घाडगे, विविध महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये व कन्या महाविद्यालयांच्या प्राचार्या, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महेंद्र सूर्यवंशी बेडके, अच्युतराव खलाटे तथा दादा आणि आप्पासाहेब घाडगे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रा. कु. आर. एस. सस्ते यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांनी सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा मांडला.
सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसह एनएमएमएस व इलेमेंटरी परीक्षा यामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित मान्यवर, सेवानिवृत्त सेवक, गुणवंत विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि बीजारोपण उपक्रमही राबविण्यात आला. यामध्ये जांभूळ, आंबा, चिंच, करंज आणि सुबाभूळ यांच्या बियांची पेरणी करण्यात आली, तर विविध सुशोभित वृक्षांचे रोपण शालेय परिसरात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ. एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य पी. डी. घनवट, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. टी. अरगडे यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्काराचे वाचन एस. डी. यादव यांनी केले, तर समारोप व आभार प्रदर्शन प्रा. सौ. सी. एस. सस्ते यांनी केले.





